Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

बहुरूपी लोककलावंताचे दर्शन झाले दुर्मिळ !

पंकज सोनी
उदरनिर्वाहाचा प्रश्न : बदलत्या काळानुसार नव्या पिढीचा नकार
सेलु, ता २७ ( बातमीदार ) : सुगीच्या काळामध्ये पूर्वी ग्रामीण भागात ‘बहुरूपी आला हो बहुरूपी आला’ असा लहान मुलांचा कल्लोळ सुरू असायचा; मात्र अलीकडे विविध देव-देवतांचे वेष धारण करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हा व्यवसाय निवडुन उदरनिर्वाह करणे अवघड बनले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात सर्रास दिसणारे लोककलावंत बहुरूपीचे दर्शन दुर्मीळ झाले आहे.
दरवर्षी खरीप हंगाम व रबी हंगामाला सुरवात झाली की, ग्रामीण भागातील ग्रामस्थ व बळीराजाकडून पसाभर धान्य मिळविण्यासाठी दारावर येणाऱ्या लोककलावंतामध्ये वासुदेव, नंदीबैलवाले, कडकलक्ष्मी व बहुरूपी अशा अनेक कलाकारांचा समावेश होता. अजूनही ही लोक गावात आली की अनेक जुन्या लोकांना आनंद होतो. पूर्वीच्या काळच्या आठवणींना ते उजाळा देतांना दिसतात. पूर्वी शेतकरी, कष्टकरीवर्ग या लोकांना कपडे, धान्य व पैसे दान करीत, तेही लोक गावातून जातांना आनंदी होऊन जात असत; मात्र बहुरूपीच्या वेशात येणाऱ्या त्या व्यक्ती आज वृध्द झाल्याने बहूरूपीचा वारसा बहुतांशी वारसांनी चालविण्याचे थांबविल्याने क्वचितच बहुरूपीचे दर्शन होऊ लागले आहे. कारण आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात हा व्यवसाय निवडून उदरनिर्वाह करणे अवघड बनले आहे. बहुरूपी स्वतःला लोककलावंत मानून उदरनिर्वाहासाठी देव-देवतांची सोंगे घेतात. आख्यायिकांच्या माध्यमातून देवदेवतांचे वर्णन करतात. ही परंपरा त्यांनी वर्षांनुवर्षे जपली आहे. परंतु हे अवलिया बदलत्या परिस्थितीमुळे हरवले आहेत. काही कला जरी जिवंत असल्या तरी बदलत्या जीवनशैलीमुळे त्यांचेही महत्व कमी झाले आहे. त्यामुळे अलिकडे या बहरूपी लोककलावंताचे दर्शन ग्रामीण भागात क्वचितच होत आहे.

छत्रपतींचा सेवक होता बहुरूपी

छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील स्वराजाची स्थापना करतांना अठरापगड जातीच्या लोकांना सोबत घेतले होते. त्यात बहरूपी समाजाचाही समावेश होता. छत्रपतींना औरंगजबाने आग्रयात नजरकैदेत ठेवले त्यावेळी बहूरूपी बहिरजी नाईक यांनी त्यांचे वेशांतर केले होते. त्यामुळे आजच्या तरूण पीढीला लोकांची माहीती होण्यासाठी अशा दुर्लक्षीत घटकांना एकत्रित आणून या समाजातील लोकांचे राहणीमान, संस्कृती या सर्व गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे.

 

पूर्वीसारखी आता परिस्थिती राहीली नाही. नवीन पीढी यात उतरायला तयार नाही. त्यामुळे आमच्यानंतर आम्हाला नाही वाटत की कोण बहुरूपी म्हणून फिरतील. त्यात महागाई, प्रवास खर्च यामुळे आता आम्हालाही परवडत नाही.
पांडुरंग भानुदास शिंदे
बहुरूपी
रा. गोपालपुर ता. केळापूर
जि. यवतमाळ

देवगावफाटा : देव-देवतांचे वेष धारण करून देवगावफाटा ( ता सेलू ) येथे आलेले बहूरूपी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *