बंडव्वाच्या शाळेत खूप वर्ग नाहीत की सिमेंटची भव्य आलिशान इमारत नाही. एका फळकुटाच्या खोलीतल्या वर्गात तिची शाळा भरते.
इथं शाळा सुरु केल्यावर अनेकांनी बंडव्वाची यथेच्छ टवाळी केली, या बायकांना शिकून काय करायचंय ? धंदा करणाऱ्या बाईने धंदा शिकून घ्यावा, बाकी ज्ञान घेऊन तिला काय साध्य होणार असे कुत्सित प्रश्नही लोकांनी विचारले. पण माझी बंडव्वा बधली नाही, तिने नेटाने आपला उपक्रम सुरु ठेवला.
लोकांच्या टवाळकीला बंडव्वा उत्तर द्यायची, या बायकांना एसटी स्टॅन्डवर किंवा रेल्वे स्टेशनवर गेल्यावर किमान गावांची नावं वाचता यायला हवीत, कारण यांनी कुणाला माहितीसाठी प्रश्न विचारले की लोक लगेच यांच्या लुगड्यात हात घालायला बघतात. स्थळ, काळ, वेळ याचं लोकांना भान नसतं. पण यांना किमान आपल्या मर्जीप्रमाणे झोपण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे, त्यासाठी थोडं का होईना लिहिता वाचता आलं पाहिजे.
बंडव्वा सांगायची की या बायकांना आपल्या बँक खात्यात किती पैसे आहेत हे जाणता आलं पाहिजे, किमान आकडेमोड आली पाहिजे. मोजकं इंग्रजी आलं पाहिजे. एखाद्या गंभीर प्रसंगी पोलिसात वा न्यायालयात आपला जबाब देता आला पाहिजे, महत्वाचे शब्द माहिती पाहिजेत !
बंडव्वाकडं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी वेश्यांना कशाचीही अट नाही. तिच्या विद्यार्थिनी सर्व वयोगटाच्या आहेत.
१९ वर्षाच्या पूजाला एक मुलगा आहे जो पक्षाघाताच्या आजाराने ग्रस्त आहे. तिच्या घरी आणखीही समस्या आहेत, या सर्वांवर मात करण्यासाठी ती लाईनमध्ये आलीय, तिला बंडव्वाचा मोठा आधार वाटतो.
शारदाला मराठी येत नाही, ती गुलबर्ग्याहू न आलीय तिला बंडव्वाची शाळा आवडते. तोडकं मोडकं मराठी आणि इंग्रजी शिकून ती पुन्हा कर्नाटकात जाणार आहे. व्यवहार करण्यासाठी ती पूर्वी अंगठा वापरायची आता सही करते ! याचं क्रेडिट ती बंडव्वाला देते.
उत्तर पूर्वेच्या राज्यातून आलेली पूजा तिच्या कुटुंबाच्या शोधात आलीय, तिला आणखी शिकून एखादी पार्टटाइम नोकरी करायची आहे.
बंडव्वाकडे काही देवदासीही शिक्षणासाठी येतात हे विशेष होय. इथल्या बायका स्थानिक मदतीशिवाय आणि शासकीय योजनांच्या कुबड्याशिवाय जगतात, त्यांना सर्वात जास्त भेडसावणारी समस्या म्हणजे असुरक्षितता आणि अनारोग्य. बंडव्वा त्यासाठीही काम करायची.
बंडव्वा लाईनमध्ये कशी आली याची कथा हृदयद्रावक आहे, धंदा करताना तिची कशी ससेहोलपट झाली हे ऐकवत नाही. आपला काळाकुट्ट भूतकाळ विसरून आपल्या सहकारी पोरीबाळींच्या जीवनात प्रकाशाचा एक कवडसा तरी यायला हवा यासाठी ती धडपडत राहायची.
सांगलीची अनेक माणसं प्रसिद्ध आहेत, अनेक स्थळं प्रसिद्ध आहेत, काही वस्तूही प्रसिद्ध आहेत. बंडव्वासारख्यांना प्रसिद्धी दिली नाहीत तरी चालेल पण तिची उपेक्षा तरी होऊ देऊ नये…
बंडव्वा मला तुझा अभिमान वाटतो, आता तू हयात नसलीस तरी मी तुझ्यात दुर्गेला पाहतो ! एका तळमळीच्या शिक्षिकेला पाहतो.
आपल्याला जो जगायला शिकवतो, जो आपलं जगणं सुकर करतो आणि ज्याच्यामुळे आपल्यातलं माणूसपण टिकून राहतं तो मोलाचा शिक्षक होय. असे शिक्षक शिक्षिका आपल्याला ऋणको बनवतात, त्यांनी जे आपल्याला दिलं तेच आपण समाजासाठी दिलं तरी त्या ऋणातून आपण थोडेफार उतराई होऊ शकतो.
– समीर गायकवाड
ज्या मुलींनी आपले चेहरे दाखवण्याची अनुमती दिली होती त्यांचेच चेहरे व्हिडीओमध्ये स्पष्ट घेतले आहेत.
व्हिडीओसाठी विशेष आभार – जनार्दन चिकण्णा, निरंजन देवरमनी, मालन गौडा आणि अनिल गौडा.