Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

मुंबई – रस्ते अपघातातील जखमींवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू करण्यात आली असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. राज्यातील तत्कालीन शिवसेना-भाजपच्या सरकारच्या कार्यकाळातील ही योजना आहे. तब्बल 5 वर्षांनी अखेर या योजनेला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे, युती सरकारच्या काळापासून प्रतिक्षेत असलेली ही योजना आता कार्यान्वित होत आहे.

बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना

अपघातग्रस्त व्यक्तीला ताबडतोब उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो, तसेच त्याच्या अपघातावरचा खर्च दिल्यास, त्याला दिलासा मिळू शकतो. आरोग्य विभागाच्या माध्यमातून अपघातग्रस्त व्यक्तींना विम्याचा लाभ देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अपघातग्रस्त व्यक्तीला ३0 हजार रुपयापर्यंतच्या उपचाराचा खर्च शासनाकडून मोफत करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कुठल्याही नागरिकाला राज्यात अपघात झाल्यास, त्याला मदत मिळणार आहे.

आजमितीस राज्य महामार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांवर अपघातात दरवर्षी सरासरी 40 हजार व्यक्ती जखमी तर 13 हजार व्यक्ती मरण पावतात. यांना वेळीच उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचू शकले असते.

या योजनेत पहिल्या 72 तासासाठी जवळच्या रुग्णालयांमधून उपचार करण्यात येतील. सुमारे 74 उपचार पद्धतीतून 30 हजार रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जाईल. यामध्ये अतिदक्षता विभाग व वॉर्डामधील उपचार, अस्थिभंग तसेच रुग्णालयाच्या वास्तव्यातील भोजन याचा समावेश असेल. यामध्ये औद्योगिक अपघात, दैनंदिन कामातील किंवा घरी घडलेले अपघात व रेल्वे अपघाताचा समावेश नाही.

या योजनेसंदर्भात कोणतीही तक्रार नोंदविण्यासाठी टोलफ्री क्रमांक देखील असेल. राज्य आरोग्य हमी सोसायटी, वरळी यांच्यामार्फत ही योजना कार्यान्वित होईल.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *