नागरिकांच्या सहकार्याने जिल्हा कोरोनामुक्त
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे प्रतिपादन
सोलापूर,दि.10 (जिमाका) : गेल्या अडीच वर्षांपासून कोरोना महामारीने जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या महामारीत प्रशासनाने नागरिकांना मदतीचा हात देऊन अनेकांचे प्राण वाचविले. अजूनही कोरोना गेलेला नसल्याने प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य केल्याने आणि शासनाच्या नियमांचे पालन केल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला आणि यापुढेही कोरोनामुक्त राहणार असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
मध्यवर्ती नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये कोविड-19 मध्ये अहोरात्र काम केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला, यावेळी श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांच्यासह पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा कोषागार अधिकारी रूपाली कोळी, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांचा बुद्धमुर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
श्री. शंभरकर यांनी सांगितले की, शासन आणि प्रशासनाला नागरिकांची साथ मिळाल्यास कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. एक टीम म्हणून काम केले, कोरोनाला हरविण्यास सर्वांचे श्रेय कामी आले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरूवातीला ऑक्सिजनची कमतरता भासत होती, मात्र माझ्यासह टीमने अहोरात्र काम केल्याने आता ऑक्सिजनची तीनपट उपलब्धता झाली आहे. प्रत्येक विभागाने शासकीय नियमांचे पालन करून काम केले. नागरिकांवर बंधने लादली, मात्र नागरिकांना त्रास होऊ दिला नाही. सामान्य बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेडची संख्या पुरेल एवढी सज्ज ठेवली आहे.
प्रत्येक नागरिकांनी कोरोनाचे लसीकरण करून घ्यावे, लहान मुलांचेही लसीकरण करून घेण्याचे आवाहन श्री. शंभरकर यांनी केले.
श्रीमती सातपुते म्हणाल्या, प्रशासनातील काम सर्वांच्या सहकार्याने टीम वर्कने होते. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपली सेवा चोख बजावली. या इमारतीमध्ये एकत्रीकरणाचे दर्शन होत आहे.
श्रीमती कोळी म्हणाल्या, कोषागार विभागाने कोरोना काळात कोणत्याही कर्मचाऱ्यांची अडचण होऊ दिली नाही. अहोरात्र काम केल्याने संकटावर मात करता आली.
राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे प्रमुख संयोजक रघुनाथ बनसोडे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगितली. जिल्हा प्रशासनाने खंबीरपणे काम केल्याने कोरोना हद्दपार झाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री. बनसोडे, राज्य कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष भीमराव लोखंडे, महिला प्रमुख जयमाला गोसावी, सिद्धार्थ कदम यांनी मान्यवरांचा सन्मान केला. कार्यक्रमाला उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, कृषी उपसंचालक श्री. मोरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. आभार पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी मानले.