सोलापूर, दि.२९: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि संसर्ग वाढून मानवाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट शहरात भाविकांना प्रवेशाला मनाई आदेश लागू केले आहेत. याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत.
आदेशात नमूद करण्यात आले आहे की, २८ डिसेंबर २०२० च्या रात्री १२ वाजलेपासून ते ३१ डिसेंबर २०२० च्या रात्री १२ वाजेपर्यंत कोणत्याही भाविक नागरिकांना अक्कलकोट शहर हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
स्वामी समर्थ समाधी ठिकाण, स्वामी समर्थ मंदीर आणि अन्नक्षेत्र या तिन्ही ठिकाणी विश्वस्त समिती मोजक्या सेवेकऱ्यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी प्रतिकात्मक स्वरूपात पार पाडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच २९ डिसेंबर रोजी होणाऱ्या दत्त जयंतीनिमित्त येणाऱ्या पालख्या, दिंड्या आणि भाविकांना अक्कलकोट शहरात प्रवेश करण्यास मनाई आहे.
महसूल, पोलीस, आरोग्य, अत्यावश्यक सेवा आणि वस्तू यांची वाहतूक, आपत्ती निवारण व्यवस्थापनमधील अधिकारी, कर्मचारी यांनी ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती/संस्था अथवा संघटना भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार कायदेशीर कारवाईस पात्र असेल. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Leave a Reply