- Big9News Network
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत यावर्षी आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस येत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी योग दिवस कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा धिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे केले.
जिल्हा प्रशासन, भारत सरकारचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो, नेहरू युवा केंद्र आणि शहरातील सर्व योग संस्थानची बैठक जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार पोलीस उपायुक्त दिपाली धाटे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार, मनमोहन भुतडा यांच्यासह पतंजली योगपीठ, योग असोसिएशन, योग सेवा मंडळ, विवेकानंद केंद्र, आर्ट ऑफ लिव्हिंग, योग साधना मंडळ, भारतीय योग संस्था, योग परिषद यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या ठिकाणी योग डेचा कार्यक्रम होणार असून सर्व शासकीय कर्मचारी, पोलीस विभागातील अधिकारी- कर्मचारी, शाळेतील शिक्षक-विद्यार्थी, नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात योग दिनी होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी केले. आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे योग प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार ते 21 जून रोजी नागरिकांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेणार आहेत. सकाळी 7 ते 8 यादरम्यान योगाचा कार्यक्रम होणार आहे.
श्री.स्वामी यांनी सांगितले की, जिल्हा स्तरावर व तालुक्याच्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात योग संस्थांनी पुढाकार घेऊन योगाचा कार्यक्रम आयोजित करावेत. याकरिता तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचे सहकार्य घ्यावे. प्रत्येक शाळेत, ग्रामपंचायत स्तरावर, शासकीय कार्यालयात योग डे साजरा करण्याचे नियोजन आहे.
श्री. चव्हाण यांनी सांगितले की, योग दिनाच्या निमित्ताने आयुष्य मंत्रालयाच्या प्रोटोकॉलप्रमाणे योगा दिवस साजरा केला जाईल. योग दिनाच्या निमित्ताने विशेष चित्रप्रदर्शनाचे आयोजन करून रोग आणि उपचार त्याचबरोबर योगाबद्दलची माहिती असणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन केले जाणार आहे.
यावेळी श्रीमती पवार यांनी सर्व प्रकारच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. उपस्थितांना मार्गदर्शन करून विविध प्रकारच्या सूचना दिल्या.