पूर्व भागात होणार अद्ययावत चौपाटी
मनपा आयुक्त पि. शिवशंकर यांची माहिती ः चौपाटीच्या क्राँकीटीकरणाचे उद्घाटन
सोलापूर ः प्रतिनिधी
सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्व भागात नवी अद्ययावत चौपाटी तयार करण्यात येत आहे. नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या निधीतून होत असलेल्या या चौपाटीच्या माध्यमातून नागरिकांना चांगली सोय उपलब्ध होईल असे महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी सांगितले. शासकीय तंत्रनिकेतनच्याशेजारील रस्त्यावर होणाऱ्या चौपाटीच्या क्राँक्रीटीकरणाचे उद्घाटन मनपा आयुक्त पि. शिवशंकर यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले.
नागेश वल्याळ यांनी आठ लाख रूपयांचा भांडवली निधी यासाठी उपलब्ध करून दिला आहे. महापालिकेकडून चौपाटीवरील सुशोभिकरण, क्राँक्रीटीकरण, विद्युतीकरण तसेच रंगरंगोटी आदी कामे वेगाने करण्यात येत आहेत. शासकीय तंत्रनिकेतनशेजारून कर्णिक नगर परिसराकडे जाणाऱ्या मोठ्या रस्त्यावर ही चौपाटी सुरू करण्यात येत आहे. यासाठी सोलापूर महानगरपालिकेकडून 16 खाद्य पदार्थ विक्रेत्यांना प्रत्येकी चार बाय पाच मीटरची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
लिलाव पद्धतीने देण्यात येणाऱ्या या जागा एक वर्षाच्या मुदतीसाठी असतील. या ठिकाणी पथदिव्यांची कमतरता आहे. त्यामुळे सोलापूर महापालिकेकडून येथे पथदिवेही बसविण्यात येणार आहेत. भविष्यात स्ट्रीट बाजार प्रमाणे हा रस्ता विकसीत करण्याचा मानस असल्याचेही महापालिका आयुक्त पि. शिवशंकर यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, संयोजक आणि नगरसेवक नागेश वल्याळ, नगरसेविका राधिका पोसा, भारतीय जनता पार्टीचे शहर संघटक सरचिटणीस रूद्रेश बोरामणी, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य श्रीनिवास दायमा, भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे शहर अध्यक्ष जयंत होले – पाटील, दत्तात्रय पोसा, शहर चिटणीस नागेश सरगम, श्रीनिवास जोगी, मुद्रा लोन शहर प्रमुख सुकुमार सिद्धम, श्री कुरूहिनशेट्टी ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर गोरंटी, जगदीश दिड्डी, महेश चिलवेरी, अनिल वंगारी ,महेश विभुते श्रीनिवास ईप्पाकायल, नवनाथ इंदापुरे, प्रकाश मिठा पल्ली आदी उपस्थित होते.
खाऊ गल्ली म्हणून व्हावी विकसीत
ही चौपाटी सोलापूरातील खाऊ गल्ली म्हणून विकसीत व्हावी, या ठिकाणी भारतभरातील विविध खाद्य पदार्थांचा आस्वाद सोलापूरकरांना घेता यावा या उद्देशाने या चौपाटीची निर्मिती करण्यात येत आहे, असे नगरसेवक नागेश वल्याळ यावेळी म्हणाले.
Leave a Reply