महेश हणमे /9890440480
सोलापूर शहर परिसरात नेहमी बघावं ते नवल असं चित्र असतं, कधी डांबरीकरण केलेल्या रस्तावर सिमेंटचा पॅच, रस्त्याच्या दुभाजकामध्ये निर्माण केलेली कचराकुंडी, भर रस्त्यावर मोकाट बसलेली जनावरे, त्याच सोबत आता खड्डे आणि धूळ याचे नवल संपलेले आहे. गेल्या दोन-तीन दिवसापासून नवरात्र सणाची तयारी म्हणून शहर परिसरातील घरांमधून स्वच्छता मोहीम हातात घेण्यात आली आहे. त्यामुळे घरात जागा नसल्याने चादरी, सतरंजी, साड्या, शर्ट पॅन्टसह लहान मुलांच्या चड्ड्या,बनियन रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी बॅरिकेट्स वर टाकण्यात आलेले आहेत. त्यावर कहर म्हणजे रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडर मध्ये जी झाडे लावण्यात आली त्यावर सुद्धा अशा पद्धतीने कपडे वाळत घातल्याने रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांची करमणूक होत आहे.
हिरवी झाडे वाळत टाकलेल्या कपड्यांमुळे रंगीबेरंगी दिसत आहेत. यामुळे डीवाईडर ओलांडून येणारी एखादी व्यक्ती अचानक समोर आल्यास मोठा अपघात होऊ शकतो. याकडे रस्ते महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी वाहनधारकांना मधून होत आहे.
टोल घेता ना ..! मग सुरक्षा, स्वच्छतेची काळजी कोण घेणार ?
शहरातून जाणारा सोलापूर हैदराबाद रोड यावर रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या झाडांवर कपडे वाळत घातल्याने रस्त्याची शोभा होत आहे. प्रशासन टोल घेते मग या रस्त्यांची काळजी स्वच्छता सुरक्षा कोण करणार असा संतप्त सवाल येथून जाणाऱ्या वाहनधारकाने विचारला.
सोशल मीडियावर सोलापूरचे कपडे..
मध्यंतरी अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या पतीने सोलापुरी चादर पासून बनवलेला शर्ट घातला त्यामुळे मोठ्याप्रमाणावर सोशल मीडियावर सोलापूर चादरीचे ब्रँडिंग झाले. आता मात्र होटगी रोडवरील विमानतळापासून हैदराबाद रोड वरील हायवेवर कपडे वाळत असल्याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
स्वच्छता जरूर करावी पण..
नवरात्र निमित्ताने घरोघरी स्वच्छता मोहीम सुरू आहे. घरची, दाराची स्वच्छता करणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगले आहे परंतु आपल्या स्वच्छतेमुळे इतरांना त्रास होईल आणि घरगुती कपडे प्रदर्शनाला मांडल्या सारखे वाळत घालणे हे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Leave a Reply