Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

रेमडीसीवीरच्या सुरळीत पुरवठ्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष
जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य विभागाकडून निर्देश
मुंबई, दि.१०: राज्यात रेमडीसीवीरचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात आज राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ. रामास्वामी यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.
राज्यात जाणवणाऱ्या रेमडीसीवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावर उपाययोजना करण्यासाठी नुकतेच आरोग्यमंत्री राजेश टोपे, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी इंजेक्शन उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनीधींची बैठक घेतली होती. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी जिल्हास्तरावर रेमडीसीवीरचा जिल्हास्तरावर पुरवठा सुरळीत होण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले होते. त्यानुसार काल सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य आयुक्तांना पत्र पाठविण्यात आले आहे.


राज्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुख्यत: खाजगी रुग्णालयात रेमडीसीवीरची मागणी वाढत आहे. त्याचप्रमाणे खाजगी औषध दुकानदारांकडुन जास्त दराने त्याची विक्री होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.

त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव काळात रेमडीसीवीरचा पुरवठा जिल्हयांमध्ये सुरळीत होण्याच्या दृष्टीने निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अंतर्गत सद्यस्थीतीत कार्यरत असलेल्या ऑक्सिजन नियंत्रण कक्षामध्ये रेमडीसीवीर बाबत तक्रारी सुध्दा स्विकारण्यात याव्यात आणि त्याचे निराकरण स्थानिक अन्न औषध प्रशासन कार्यालयामार्फत करण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात दिल्या आहेत.
जिल्हास्तरावर तांत्रिक समिती गठीत करून त्यामार्फत खाजगी रुग्णालयात रेमडीसीवीरचा उपयोग योग्य पध्दतीने होत आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. रेमडीसीवीरची गरज भासल्यास राज्य स्तरावरील अन्न औषध प्रशासनच्या राज्यास्तरीय नियंत्रण कक्षाशी संपर्क करुन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश पत्रात दिले आहे.

अजय जाधव..१०.४.२०२१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *