Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

  सोलापूर,दि.24: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी 10 वी आणि 12 वीचे वर्ग सोडून शहर आणि जिल्ह्यातील इतर सर्व शाळा 7 मार्च 2021 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश राहणार असून या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असेही श्री. भरणे यांनी सांगितले.

      कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकाऱ्यांची आज नियोजन भवन येथे श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक बैठक घेण्यात आली. सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरूद्ध कांबळे, महापौर श्रीकांचना यन्नम, आमदार बबनराव शिंदे, सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत, प्रणिती शिंदे, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आदी उपस्थित होते.

      श्री. भरणे यांनी सांगितले की, सोलापूरकरांनी कोरोना लढ्यात साथ दिल्याने कोरोनाचे संकट परतवून लावण्यास मदत झाली. पुन्हा कोरोनाचा नवा स्ट्रेन आलेला आहे. सोलापूर जिल्ह्यात रूग्ण वाढू लागले आहेत. आपल्याला पुन्हा लॉकडाऊन परवडणारा नाही, मात्र नागरिकांनी शासकीय आणि आरोग्य नियमाचे काटेकोर पालन करणे हिताचे आहे. काही कडक निर्बंध घालणे जरूरीचे आहे. सोलापूरकरांनी मास्कचा वापर, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर ठेवल्यास कोरोनाला अटकाव करू शकतो. प्रत्येक नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.

      ट्रेसिंगटेस्टिंग आणि ट्रीटमेंटवर भर द्या

कोरोनाचा संभाव्य प्रसार रोखण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्या वाढवा. ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीवर भर देऊन प्रभावीपणे राबवा. जे संसर्ग पसरवणारे आहेत त्यांच्याही चाचण्या करा. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलची तयारी करा. प्रत्येक ठिकाणी सुविधा देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

      कोरोना लसीकरण वाढवा

कोरोनाचे लसीकरण पहिल्या टप्प्यात 58 टक्के तर दुसऱ्या टप्प्यात 40 टक्के झाले आहे. लसीकरणाची टक्केवारी वाढविण्याच्या सूचनाही श्री. भरणे यांनी केल्या. गर्दीची ठिकाणे, भाजी मंडई याठिकाणी पोलिसांनी लक्ष द्यावे. जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी नियोजन करून मंडईसाठी वेगळी यंत्रणा करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

      गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांना एक हजार रूपये दंड

गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे गरजेचे आहे. जे वापरणार नाहीत त्यांना एक हजार रूपयांचा दंड आणि इतर ठिकाणी वापरणार नाहीत, त्यांना 500 रूपयांचा दंड आकारण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे श्री. भरणे यांनी सांगितले.

जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 5 पर्यंत राहणार संचारबंदी

      कोरोनाचा प्रादुर्भाव आणि संसर्ग कमी करण्यासाठी 7 मार्च 2021 पर्यंत जिल्ह्यात रात्री 11 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी करण्याच्या सूचना श्री. भरणे यांनी दिल्या. मात्र या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. दवाखाने, औद्योगिक संस्था, औषधांची दुकाने सुरू राहतील.

  ग्रंथालय/अभ्यासिका राहणार सुरू

राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय नियमाचे काटेकोर पालन करून ग्रंथालय/अभ्यासिका सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये केवळ 50 टक्केची अट राहणार आहे.

 विवाह सोहळ्यांसाठी पूर्वीप्रमाणे नियम

      विवाह सोहळे, मंगल कार्यालये सुरू राहतील, मात्र पोलिसांची परवानगी काढावी लागेल. पूर्वीप्रमाणे 50 लोकांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळा करता येणार आहे. मास्कचा वापर प्रत्येक ठिकाणी सक्तीचा असणार आहे.

 हॉटेलबाररेस्टॉरंट रात्री 11 पर्यंतच

गर्दी टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट रात्री 11 वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याच्या निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. 11 नंतर सुरू राहणाऱ्या हॉटेल, बारवर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत.

 इतर राज्यातून येणाऱ्यांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे

      सोलापूर जिल्ह्यात इतर राज्यातून येणाऱ्या व्यक्तींना उद्यापासून (दि.25) कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्राशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही.

 मंदिरेपर्यटनस्थळेक्रीडांगणे राहतील सुरू

      मंदिरे, पर्यटनस्थळे, क्रीडांगणे सुरू राहतील. मात्र याठिकाणी शासकीय नियमाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 7 मार्च 2021 पर्यंत मंदिराच्या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्के व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे.  तसेच क्रीडांगणे ही केवळ मॉर्निंग वॉकच्या वापरासाठी असणार आहेत. याठिकाणी स्पर्धा, मुलांना खेळण्यास परवानगी नसणार आहे.

 साठेबाजांवर होणार कारवाई

      लॉकडाऊनचे कारण देत अनेकजण अन्नधान्य आणि इतर वस्तूंचा साठा करीत आहेत, अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. मात्र साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. भरणे यांनी दिले.

 सोलापूरकरांना आवाहन

      सोलापूरकरांनो लॉकडाऊन टाळायचा असेल तर नियमांचे पालन करा. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. घरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांची काळजी घ्या, मास्कचा वापर करा. सॅनिटायझर, साबणाने हात धुवा, गर्दीची ठिकाणे टाळा, सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन श्री. भरणे यांनी केले.

      अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. जाधव यांनी ग्रामीण भागातील कोरोनाच्या स्थितीचे सादरीकरण केले तर मनपा आयुक्त श्री. शिवशंकर यांनी शहरची स्थिती मांडली.

      बैठकीला राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक रवींद्र आवळे, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या अधिष्ठाता शुभलक्ष्मी जयस्वाल, लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरूद्ध पिंपळे यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *