भाद्रपद मासात येणार्या गौरींचे पूजन करून अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी स्त्रिया हे व्रत करतात.
ज्येष्ठागौरी पूजन महाराष्ट्रात भिन्न-भिन्न रितीने केले जाते. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठागौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. याला ‘ज्येष्ठागौरी पूजन’ असे म्हटले जाते. काही गावांत या गौरी सोन्या-चांदीचे वा पितळेचे मुखवटे धारण करणाऱ्या असतात. त्या मूर्तिना चांगल्या साड्या नेसवून दागदागिन्यांनी नटवले जाते. तर काही ठिकाणी केवळ कागदावर गौरीचे चित्र काढून किंवा छापील कागद आणून तिचे पूजन केले जाते. कित्येक गावांत अशी प्रथा आहे की, नदीतील पाच खडे किंवा लहान दगड आणावयाचे आणि तेच पूजावयाचे. गंमत अशी की, कित्येक ठिकाणी तर मातीचे लहान लहान घट आणून त्यात हळद बांधलेला दोरा, खारीक आणि खोबरे घालतात आणि ते घट एकावर एक ठेवून ती उतरंड गौरी म्हणून पूजतात.
गौरी अनुराधा नक्षत्रावर येत असल्या, तरी तिचा दिग्विजयी पुत्र मात्र तिथीनुसार चतुथीर्च्या दिवशीच आलेला असतो. जाताना कित्येक ठिकाणी विश्वमाऊली गौरी आपल्या पुत्राला बरोबर घेऊन जाते. ज्या घरी गौरी पूजनाची प्रथा नाही तिथे मात्र गणपतीचा मुक्काम हा गौरी विसर्जनानंतही असू शकतो. दोन, चार, सहा, अकरा किंवा एकवीस दिवसही असा हौसेखातर किंवा श्रद्धेपोटी गणपती घरात ठेवला जातो. मायमाऊली गौरी नक्षत्रावर भर देते, तर पुत्र तिथीप्राधान्य मानतो. हे व्यक्तिस्वातंत्र्य आपल्याकडे पूवीर्पासूनच आहे.
कथा
पुराणात अशी कथा आहे, असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया श्रीमहालक्ष्मी गौरीला शरण गेल्या. त्यांनी आपले सौभाग्य अक्षय्य करण्याविषयी तिची प्रार्थना केली. श्रीमहालक्ष्मी गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून शरण आलेल्या स्त्रियांच्या पतींना आणि पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले; म्हणून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.
व्रत करण्याची पद्धत
हे व्रत तीन दिवस चालते. प्रांतभेदानुसार हे व्रत करण्याच्या विविध पद्धती आहेत. यामध्ये धातूची, मातीची प्रतिमा करून अथवा कागदावर श्री महालक्ष्मीचे चित्र काढून, तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते. (महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात. काही ठिकाणी सुवासिक फुले येणार्या वनस्पतीची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा बनवतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात. त्या मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात. – ही एक रूढी आहे.)
गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसर्या दिवशी तिची पूजा करून नैवेद्य दाखवतात.
तिसर्या दिवशी गौरीचे नदीत विसर्जन करतात आणि परत येतांना नदीतील थोडी वाळू किंवा माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात.