लॉकडाऊनमध्ये दुचाकीवर फक्त चालकास परवानगी गाडी जप्त केल्यास ३० एप्रिलनंतर मिळणार

सोलापूर,दि.१० : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उद्या ( शनिवार ) व रविवारी कडक लॉकडाऊन राबविण्यात येणार असून अत्यावश्यक कामास बाहेर पडल्यानंतर दुचाकीवर फक्त चालकाला परवानगी आहे. या काळात गाडी जप्त केल्यानंतर ती लॉकडाऊन मुदत संपल्यानंतर म्हणजे ३० एप्रिलनंतर दंड भरुन परत देण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरिकांनी आपल्या अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, ६० वर्षांपेक्षा जास्त व दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनी दोन दिवस अजिबात घराबाहेर अत्यावश्यक फिरू नये. ज्येष्ठ नागरिकांच्या घरी बाजारातून जीवनावश्यक वस्तू आणायला जाण्यास कोणी नसेल तर शेजाऱ्यांची मदत घ्यावी किंवा पोलिसांना १०० नंबरवरून फोन करुन पोलिसांची मदत घ्यावी. पोलीस आपल्या घरी येऊन जीवनावश्यक वस्तू आणून देतील, असे डॉ. कडूकर म्हणाल्या.

नागरिकांना कामासाठी जायचे असल्यास दुचाकीवर फक्त चालकाला परवानगी आहे. डबल किंवा ट्रीपल सीट वाहन चालवू नये. तसे आढळल्यास त्यांची दुचाकी जप्त करण्यात येईल. व ती गाडी लॉकडाउन संपल्यानंतर गाडीवर आधी असलेला दंड भरून घेऊन, कागदपत्रे तपासून परत देण्यात येईल, असेही कडूकर म्हणाल्या.