- पंढरपूर शहरात आषाढी वारी कालावधीत एसटी, खाजगी वाहतूक राहणार बंद
जिल्हा प्रशासनाचे आदेश जारी
सोलापूर, दि.15 : आषाढी वारी कालावधीमध्ये पंढरपूर शहरात एसटी, खाजगी बस सेवा 17 ते 25 जुलै 2021 पर्यंत येण्यास आणि जाण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.
आदेशात नमूद करण्यात आल्यानुसार पंढरपूर शहरामध्ये 19 ते 24 जुलै 2021 या कालावधीमध्ये आषाढी वारी होत असून वारीसाठी किंवा पादुकांच्या दर्शनासाठी भाविक एसटीने किंवा खाजगी बसने येण्याची शक्यता आहे. भाविक मोठ्या प्रमाणावर आले तर पंढरपूर शहरात कोविड 19 चा संसर्ग वाढून मानवी जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो, यामुळे एसटी आणि खाजगी बस सेवेवर बंदी घालण्यात येत आहे.
पंढरपूर शहर आणि आजूबाजूच्या गावातून भाविक/नागरिकांना वारीसाठी, पादुकांचे दर्शनासाठी, श्री विठ्ठल मंदिर परिसरात दर्शनासाठी आणि चंद्रभागेमध्ये स्नानासाठी मनाई करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि गोपाळपूरसाठी 18 जुलैच्या सकाळी 6 वाजलेपासून ते 24 जुलै 2021 च्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत, शहरातील नगरप्रदक्षिणाचे आतील बाजूस, सर्व घाट, वाळवंट परिसर, मंदिर परिसर 18 जुलैच्या सकाळी 6 वाजलेपासून ते 25 जुलै 2021 च्या सायंकाळी 4 वाजेपर्यंत आणि भाटुंबरे, चिंचोळी भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी या ग्रामपंचायत हद्दीत 18 जुलैच्या सकाळी 6 वाजलेपासून ते 22 जुलै 2021 च्या सकाळी 6 वाजेपर्यंत मनाई आदेश राहणार आहेत.
हे आदेश अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, मंदिर समिती पासधारक किंवा परवानाधारक व्यक्ती, कर्तव्यावर असणारे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी, वारीसाठी शासनाने परवानगी दिलेल्या मानाच्या पालख्या व सोहळे, जीवनाश्यक वस्तू व सेवा यांना लागू राहणार नाहीत.
आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती/संस्था अथवा संघटना यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी आणि इतर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Leave a Reply