‘सानेन बकरी’चे राज्यात पैदास केंद्र उभारणार – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

  • सानेन बकरीचे राज्यात पैदास केंद्र उभारणार
    पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांची माहिती

पंढरपूर, दि. 4: शेतकऱ्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी शेळी व मेंढी पालन व्यवसायास चालना देणे आवश्यक आहे. यासाठी जगात जास्त दूध देणारी सानेन बकरीचे पैदास केंद्र महाराष्ट्रात उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास प्रक्षेत्र, महूद ता.सांगोला येथे भेट देवून पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.एन.ए.सोनवणे, प्रभारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.एस.एस.बोरकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेळी व मेंढी विकास प्रक्षेत्राचे संचालक डॉ.शशांक कांबळे, सहाय्यक आयुक्त डॉ.एस.एस.भिंगारे तसेच परिसरातील शेळी, मेंढी पालक उपस्थित होते.

श्री. केदार म्हणाले, शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी उच्च प्रतीच्या शेळया व मेंढयाची पैदास करुन देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. पशुधन निरोगी रहावे, आजारी पशुधनाला जागेवरच उपचार मिळावेत यासाठी वैद्यकीय पथकासह फिरते पशुवैद्यकीय रुग्णालय सुरु करण्यात आले असल्याने शेतकऱ्यांना पशुधनावरील उपचाराची सुविधा दारातच मिळणार आहे.
मेंढीच्या माडग्याळ जातीचे वजन लवकर वाढत असल्याने या जातीचे पैदास केंद्र उभारण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. विमा काढलेल्या पशुधनाची नुकसान भरपाई तत्काळ मिळेल याची दक्षता घ्यावी. अशा सूचनांही मंत्री केदार यांनी दिल्या.

डॉ.कांबळे यांनी प्रकल्पातील शेळी, मेंढी पालन, वैद्यकीय सुविधा, चारा आदी सुविधेबाबत माहिती दिली.