मंद्रुप पोलिस ठाणे हद्दीत काल वडापुर येथील ज्ञानदेव नागणसूरे या व्यक्तीचा त्याच गावात राहणारा व पॅरोल रजेवर आलेला आरोपी आमोगसिद्ध भिमु पुजारी याने धारदार शस्त्राने खून केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार आरोपीचा काल पासून वाडी वस्ती, आरोपीचे नातेवाईक, एस टी स्टँड येथे कसून शोध घेत होते.
आज मंगळवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी आरोपी अंत्रोळी- विंचूर अंतर्गत रस्त्यावर असल्या बाबत माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी साधारण पावणे पाच वाजता मंद्रूप पोलीस स्टेशनचे PSI श्री. अमित करपे यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या टोल फ्री नंबर 18002703600 चा वापर करून अमोगसिद्ध भिमू पुजारी हा खुनातील आरोपी, आंत्रोळी- विंचूर या गावांमध्ये पायी चालत चालला आहे, अशी सर्व गावकऱ्यांना माहिती दिली. तसेच आंत्रोळी गावच्या महिला सरपंच यांनी गावकऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. सर्व गावकरी रस्त्यावर आले व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यात गावकऱ्यांच्या मदतीने मंद्रूप पोलीस स्टेशनच्या अधिकारी व स्टाफला यश आले. ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या तात्काळ व प्रभावी वापरामुळे व मंद्रुप पोलिसांच्या प्रयत्नाने खुनातील आरोपी जेरबंद होण्यास मदत झाली.
जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंद्रूप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. नितीन थेटे, पीएसआय अमितकुमार करपे, अल्लाबक्ष सय्यद तसेच एएसआय लिगेवान, मुलाणी, हवलदार महिंद्रकर, श्रीकांत बुरजे, व्हनमाने, कोळी, काळे व वाघमारे यांच्या पथकाने या कारवाईत भाग घेतला.