- चिपळूण पुरग्रस्तांसाठी वटवृक्ष देवस्थानकडून मदत
- मदतकार्य सोलापूर धर्मादाय कार्यालयात सुपूर्द
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि. २/८/२०२१) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने चिपळूण येथील पुरग्रस्त नागरिकांसाठी १०० चादरींची मदत जाहीर करून हे वस्तुरूपी १०० चादरीचे मदतकार्य सचिव आत्माराम घाटगे यांनी सोलापूर धर्मादाय कार्यालयाकडे सुपूर्द केल्याची माहीती मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
या प्रसंगी बोलताना इंगळे यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती ही सेवाभावी संस्था आहे. या संस्थेच्या वतीने वर्षभरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात. कोरोना लॉकडाऊनच्या काळात देवस्थानच्या वतीने शहरातील गरजूंना भोजन प्रसादाच्या माध्यमातून अन्नदान, कोरोना ग्रस्तांना देवस्थानच्या रूग्णालयात उपचार व भक्तनिवासात राहण्याची व्यवस्था देवस्थानने अखंडपणे केली आहे. वर्षभरात विविध उपक्रम राबवून देवस्थान समितीकडून धार्मिक कार्यासोबतच सामाजिक व शैक्षणिक कार्याची सेवाही वेळोवेळी जोपासली जाते. गतकाळात कोल्हापूर सांगली व परिसरातील पुरग्रस्त नागरिकांसाठी मंदिर समितीच्या वतीने स्वामी प्रसाद म्हणून आर्थिक मदतही देण्यात आली होती. या पार्श्वभुमीवर यंदाच्या कोकणातील पावसाच्या पुरात चिपळूण मधील नागरिकांचे अतोनात नुकसान झाल्याचे ऐकून त्यांना स्वामी प्रसाद म्हणून १०० चादरींची मदत पाठविली असल्याचे मनोगत व्यक्त केले.