स्वतः लक्ष घालून जिल्हा क्रीडा संकुलातील समस्या सोडविणार – प्रणिती शिंदे
सोलापूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याच्या आंतरजिल्हा स्पर्धांसाठी सोलापूर जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी सोलापूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेकडून घेण्यात येणारी अजिंक्यपद स्पर्धा दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर दिनांक 9 ऑगस्ट ते 11 ऑगस्ट दरम्यान सोलापूर येथे बॅडमिंटनची जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा संपन्न झाली. जिल्हा क्रीडासंकुल येथे या स्पर्धांचे नियोजन करण्यात आले होते मात्र पावसामुळे तो हॉल गळू लागला व सामने घेणे कठीण झाल्याने सर्व सामने ऑफीसर्स क्लब आणि रेल्वे ग्राउंडवरील बॅडमिंटन हॉलमध्ये हलविण्यात आले. शेकडो वेळा जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरुस्ती आणि देखभाली संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी भेटून, पत्र व्यवहाराद्वारे, त्यांना प्रत्यक्ष बॅडमिंटन हॉलवर बोलावून समस्या दाखवून देखील या संदर्भात कोणतीच उपाययोजना होत नसल्याने सर्वच खेळाडू, त्यांचे पालक आणि संघटनेच्या पदाधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली.
सामने सुरळीत पार पडण्यासाठी आणि त्यामध्ये तटस्थता असावी तसेच मोठ्या स्पर्धांमधील पंचांचा सोलापुरातील खेळाडूंना देखील अनुभव यावा याकरिता जिल्हा संघटनेने पुणे आणि कोल्हापूर येथून पंच बोलाविले होते. मूळचे सोलापुरातील व आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंच म्हणून नावलौकिक मिळविलेले सोलापूर संघटनेचे पदाधिकारी श्री. शशांक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली या पंचांनी सर्व सामन्यांचे काम पाहिले. सोलापुर शहरासह जिल्ह्याच्या विविध तालुक्यातील सुमारे 180 खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला सोलापूर शहरासह पंढरपूर व बार्शी येथून मोठ्या संख्येने खेळाडू या स्पर्धेकरिता सहभागी झाले होते. दहा वर्षाखालील वयोगटापासून खुल्या गटापर्यंत वेगवेगळ्या गटातील सुमारे 200 सामने या तीन दिवसांमध्ये खेळविले गेले.
अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यांमध्ये सोलापुरातील उत्तमोत्तम खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी सोलापुरातील नागरीकांना मिळाली. दिनांक 11 ऑगस्ट रोजी झालेल्या अंतिम सामन्यांना सोलापुरातील अनेक खेळाडू, क्रीडा प्रेमींनी हजेरी लावली होती. दरवर्षी या स्पर्धेतील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पुरुष एकेरी मधील विजेत्या खेळाडूस स्व. रेगे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा फिरता चषक दिला जातो तसेच महिला विजेती स्पर्धकास वाम्सी रेड्डी चषक दिला जातो. यावर्षी पासून स्पर्धेमध्ये कै. विजय कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुरुष दुहेरी मधील स्पर्धकांना फिरता चषक दिला गेला. हा चषक देण्यासाठी कै. विजय कुलकर्णी यांचे परमस्नेही व्यापारी बँकेचे संचालक श्री. राजगोपाल झंवरजी स्वतः उपस्थित होते. तर इतर सर्व खेळाडूंना सोलापूरच्या सन्माननीय आ. प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या वेळी बोलताना प्रणिती ताईंनी सर्व खेळाडूंना व पालकांना मार्गदर्शन तर केले, सर्व विजेत्या खेळाडूंचे कौतुक देखील केले. त्याच बरोबर स्वतः लक्ष घालून जिल्हा क्रीडा संकुलातील समस्या सोडविण्याचे आश्वासन देखील दिले.
राहूल तिवारी यास पुरुष एकेरी, पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा तीन गटांमध्ये पारितोषिक मिळाले, तिहेरी मुकूट त्याने संपादन केला तर अथर्व देशपांडे, शर्व बिराजदार यांना दुहेरी मुकुट प्राप्त झाला. सर्वत सामन्यांमध्ये अत्यंत चुरस पाहण्यास मिळाली. या स्पर्धा संपन्न होण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष श्री. जितू राठी, उपाध्यक्ष श्री. मनोज मुलगे, सेक्रेटरी श्री. ओंकार दाते, संघटनेच्या पदाधिकारी सौ. सीमा जोग, श्री. किरण देशपांडे तसेच संघटनेचे पदाधिकारी व आंतरराष्ट्रीय पंच श्री. शशांक कुलकर्णी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतले. विजेत्या खेळाडूंमधून महाराष्ट्र राज्याच्या आंतरजिल्हा स्पर्धेकरिता सोलापूर जिल्ह्याच्या विविध संघांची निवड केली जाणार आहे.
Winner Of Augst -22 Solapur District Badminton Champioship.
Event Players name
10 वर्षाखालीलमुले एकेरी श्रेयांश हुबळीकर
10 वर्षाखालीलमुली एकेरी आर्या स्वामी
13 वर्षाखालीलमुले एकेरी शर्व बिराजदार
13 वर्षाखालीलमुली एकेरी श्रावणी सावंत
13 वर्षाखालीलमुले दुहेरी शर्व बिराजदार आणिआयुष मुनोत
15 वर्षाखालीलमुले एकेरी अनमोल शक्य
15 वर्षाखालीलमुली एकेरी अक्षरा यादव
15 वर्षाखालीलमुले दुहेरी मीत बजाज आणि आर्यनकटकमवार
17 वर्षाखालीलमुले एकेरी ओम उन्हाळे
17 वर्षाखालीलमुली एकेरी श्रेया मिस्कीन
17 वर्षाखालीलमुले दुहेरी ओम उन्हाळे आणिबुऱ्हान बोहरी
19 वर्षाखालीलमुले एकेरी अथर्व देशपांडे
19 वर्षाखालीलमुली एकेरी आर्या शिंदे
19 वर्षाखालीलमुले दुहेरी अथर्व देशपांडे आणिरेहान शेख
पुरुष एकेरी राहूल तिवाडी
मिश्र दुहेरी राहूल तिवाडी आणिवेदश्री बंडेवार
पुरुष दुहेरी राहूल तिवाडी आणि आनंदमुसळे