Latest Post

कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण कृषी महाविद्यालय उदगीरच्या कृषीदूतांची ग्रामीण बँकेला भेट

Big9 News 

सोलापूर – प्रवाशांना अल्पदरात पिण्यायोग्य पाणी उपलब्ध करून देण्यासाठी भारतभरातील विविध रेल्वे स्थानकांवर ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ स्थापित केल्या आहेत. सोलापूर रेल्वे स्थानकात ५ वॉटर व्हेंडिंग मशीन बसवण्यात आल्या आहेत; मात्र या सर्व मशीन बंद आहेत. त्या तात्काळ चालू करण्यात याव्यात, या मागणीचे निवेदन, हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर) यांना देण्यात आले. हे निवेदन कार्यालयातील सचिव एच. ताजुद्दीन यांनी स्वीकारले. या वेळी कर सल्लागार  गणेश वास्ते, रमेश पांढरे, आनंद चौगुले, नितीश बोगा, हिंदु जनजागृती समितीचे दत्तात्रय पिसे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, वॉटर व्हेंडिंग मशीन प्रकल्पाचे सर्वत्र कौतुक झाले होते; मात्र आयआरसीटीसीने लाँच केलेल्या या ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’वर आता ‘आऊट ऑफ ऑर्डर’ नोटीस चिकटवली आहे. प्रवाशांच्या हितासाठी काम न करणार्‍या ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ किंवा ‘वॉटर एटीएम’ पुन्हा चालू करण्याची प्रक्रिया करावी, तसेच रेल्वे बोर्डाकडे तशी शिफारस करावी. मार्च २०२२ मध्ये, पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे अधिकार्‍यांनी असा दावा केला होता की ते अकार्यक्षम ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ पालटतील; मात्र रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ व्ही.के. त्रिपाठी यांनी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, भारतीय रेल्वेने कोरोना काळातील दळणवळण बंदीपासून रेल्वे स्थानकांवर बंद असलेल्या ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ पुन्हा चालू न करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे स्थानकांवर केवळ आमच्या पिण्याच्या पाण्याच्या नळांवर पाणी उपलब्ध आहे.

रेल्वे आता ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ ही ‘अयशस्वी योजना’ असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे १ लीटरची बाटलीबंद पाणी १५ रुपयांना विकत घेण्याविना प्रवाशांना पर्याय नाही. सध्या  ही संकल्पना मोठ्या प्रमाणामध्ये गतीशील आहे, तरी मूलभूत सुविधांकडेही लक्ष दिले जावे अशी सर्वसामान्यांची अपेक्षा मात्र दुर्लक्षित करून चालणार नाही. रेल्वे प्रवासी विविध माध्यमांतून ‘वॉटर व्हेंडिंग मशीन’ प्रकल्प बंद करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत, तसेच याविषयी रेल्वे अधिकार्‍यांवर टीकाही करत आहेत. प्रवाशांपेक्षा कॅन्टीन आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल यांना लाभ व्हावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे दिसते, अशा प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त केल्या जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *