भोसे करकंबची कन्या करतेय मुंबईच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये रुग्णसेवा
डॉ.नम्रता जयवंत तळेकर करतेय मागील ४ महिन्यापासून कोव्हीड रुग्णांची अविरत सेवा..
प्रतिनिधी | करकंब
कोरोना विषाणूने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला असून, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली असून, कोरोना योद्धा म्हणून डॉक्टर, परिचारिका व इतरजण अहोरात्र काम करत आहेत. अनेक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी कोरोनाग्रस्तांवर भीतीपोटी उपचार करण्यास टाळाटाळ करत होते याचेही चित्र पाहायला मिळत होते. मात्र याला अपवाद ठरली आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भोसे गावची २३ वर्षीय कन्या. डॉक्टर नम्रता जयवंत तळेकर असे तिचे नाव आहे. ती मुंबई येथे मागील ४ महिन्यांपासून कोरोना रुग्णांची सेवा करत आहे. सध्या ती बिकेसी जम्बो कोविड सेंटरमध्ये सेवा देत आहे. १००० खाटांच्या या कोविड सेंटरमध्ये डॉक्टर म्हणून आपली सेवा देत आहे. तिच्या या कार्याबद्दल तिचे कौतुक होत आहे. जून महिन्यात तिने कामाला सुरुवात केली. एक मुलगी असूनही तिने इतर पालकांच्या व मुलींच्या पुढे एक वेगळा आदर्श उभा केला आहे.
लोकमान्य टिळक मुन्सिपल मेडिकल कॉलेज सायन मुंबई येथे एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षात ती शिकत आहे. कोविड रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने डॉक्टरांची गरज निर्माण झाली होती. सायन हॉस्पिटल मुंबईच्या वतीने शिकाऊ डॉक्टरांना रुग्णसेवेसाठी बोलवण्यात आले होते. अशावेळी कोरोनाची प्रचंड भीती असल्यामुळे नम्रताच्या कुटुंबीय तिला कोविड ड्युटी करण्यास प्रचंड विरोध करत होते. नम्रताचे वडील जयवंत तळेकर हे आर्मी ऑफिसर होते. लहानपणापासूनच वडिलांकडून देश सेवेची प्रेरणा मिळाली असं ती सांगते.
परंतु आपण या देशाचं काहीतरी देणे लागतो. या महामारीला तोंड देण्यासाठी आपण देशसेवेसाठी उतरले पाहिजे असे नम्रताला सातत्याने वाटत होते.
परंतु लॉकडाउनच्या काळात परिवहन सेवा ही पूर्णपणे बंद होती. त्यामुळे मिळेल त्या गाडीने काहीही करून सायन हॉस्पिटल ला पोहोचायचे तिने निश्चय केला होता. त्यामुळे तिने ठरवून तरकारी वाहनाने ती मुंबईला गेली. बीएमसी मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून रुजू झाली. ड्युटी करत ती मालाड थर्मल स्क्रीनिंग कॅम्पमध्ये सहभागी झाली. त्यानंतर त्यांनी वार रूम मध्येही कामकाज केले. व आता त्यानंतर बीकेसी जम्बो कोविड सेंटर हॉस्पिटला मेडिकल ऑफिसर म्हणून काम पाहत आहे. गेल्या चार महिन्यांपासून ती आठ तासांची ड्युटी असतानाही दहा ते बारा तास कोविडग्रस्तांसाठी अविरत काम करत आहे.
८-१० तास पीपीई किटमध्ये राहून रुग्णसेवा करावी लागत आहे. सोबत असणारे काहींना कोरोना झाला. पण तळेकरयांची टेस्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांनी पुढे काम सुरू केले. कोरोना पॉझिटिव्ह नागरिकांना बरोबरच त्यांच्या घरातील व नातेवाईकांना ही योग्य ते त्या मार्गदर्शन करत आहेत. कोरोनाशी मुकाबला करत त्या रुग्णांची सेवा करत आहेत.
कोरोना ड्युटी करत असतानाच ती एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा अभ्यास, ऑनलाईन लेक्चर्स ही करत आहे. कोवीड रुग्णांवर केलेल्या सेवेमुळे रुग्ण बरे होऊन घरी परतताना जे आभार व्यक्त करतात त्याचे मनाला खूप समाधान मिळते असे ती सांगते.
ग्रामीण भागातील मुलगी रुग्णसेवेसाठी स्वतःला वाहून घेते ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. नम्रताच्या या धाडशी कर्तव्याने तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.
घरच्यांशी राहतात नेहमीच संपर्कात-
कोविड काळात सेवा बजवत असताना घरचे रोजच काळजी करत असतातच. पण मिळणाऱ्या वेळेनुसार त्या कॉल व व्हिडीओ कॉल वर बोलतात. तसेच आलेले अनुभव त्यांना सांगितात व मित्रपरिवार यांनाही योग्य त्या मार्गदर्शन करतात.
कोविड ड्युटी माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत…
ही कोविड ड्युटी माझ्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. माझ्यासाठी ही मोठी संधी आहे. चांगली गोष्ट करत असताना त्यागाची भूमिका असावी लागते. दररोज चे काम करून आनंदच मिळतो. याकाळात नवीन लोक, नवीन बरेच काही शिकता आले. लवकरच ही स्थिती सुधारू. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. महामारी जरी मोठी असली तरी आपण सकारात्मक व आनंदित राहण्याने नक्कीच त्यावर विजय मिळवता येईल. शक्य तोपर्यंत ही सेवा बजावणार आहे.
डॉ. नम्रता जयवंत तळेकर
भोसे