सोलापूर : चित्रकला व संगीत या दोन्हींना हजारो वर्षांची परंपरा आहे. दोन्ही कला जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये विकसित झालेल्या आहेत. दोन्ही कलांमध्ये अनेक प्रयोग झाले आहेत, कलाकारांनी आपल्या शैली निर्माण केल्या आहेत. थोडक्यात दोन्ही कला तुलना करण्याजोग्या आहेत. मात्र, संगीताचा जितक्या प्रमाणावर प्रसार झालेला दिसतो, तितक्या प्रमाणात चित्रकलेचा झालेला दिसत नाही. या कलेचा अधिक प्रचार व्हावा, यासाठी एक युवा चित्रकार धडपड करत आहे.

सिद्धार्थ शिरसट असे या युवा चित्रकाराचे नाव आहे. २४ वर्षीय सिद्धार्थ आपल्या कुंचल्यातील बहारदार चित्रे रेखाटतो. सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचे कौतक करण्यासाठी तो त्यांची स्वत:ची अथवा इतर धार्मिक चित्रे काढून तो भेट म्हणून देतो. या युवा चित्रकारांची कौतुक करण्याची पद्धत पाहून लोक देखील आवाक होतात. विशेष म्हणजे मिळालेली भेट वस्तू हा त्यांचाच फोटो असल्याने भेट स्वीकारताना लोकांना मनस्वी आनंद होतो.
चित्रकार सिद्धार्थ सांगतो की, “मी दिलेली भेट ही चित्रांच्या स्वरूपातली असते. लोक ते स्वीकारतात. लोकांनी त्या कलेला प्रोत्साहन द्यावा, त्यांच्या मनातही कलेविषयी आदर-आपुलकी निर्माण व्हावी आणि कलेचा प्रसार-प्रचार व्हावा, हा हेतू चित्र भेट देण्यापाठीमागे असतो. यातून एखाद्या कलाकाराला प्रोत्साहनदेखील मिळते.यामुळे एक वातावरण तयार होते. आतापर्यंत मी अनेक सामाजिक कार्यकर्ते, पोलीस यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांची व्यक्तिचित्रे काढून त्यांना भेट म्हणून दिली आहेत.”
बालपणापासून चित्रकलेची आवड
सिद्धार्थला बालपणापासून चित्रकलेची आवड होती. चित्रकलेची ही कला त्याची आई रंजना ने ओळखले आणि यामध्ये करिअर घडवण्यासाठी प्रोत्साहन आणि पाठबळ दिले. प्रारंभी तो प्रा. संजय नोरा यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकलेचे धडे गिरवू लागला. जगप्रसिद्ध चित्रकार सचिन खरात यांच्याकडूनही त्याने चित्रकलेचा कानमंत्र घेतला. सिद्धार्थने अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयातून एटीडी आणि कलासागर महाविद्यालय पुणे येथून जेडी आर्टचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
राजस्थानी व्यक्तिरेखा काढण्यात पारंगत
सिद्धार्थचा राजस्थानी लोकांच्या व्यक्तिरेखा (पोट्रेट चित्रे) काढण्यामध्ये हातखंडा आहे. राजस्थानी व्यक्तींची काढलेली हुबेहूब चित्रे पाहून राजस्थानची संस्कृती डोळ्यासमोर येते.
त्याची ही नजरेत भरणारी चित्रे पाहून डोळे दिपून जातात.
विशेष म्हणजे तो चित्रे काढताना केवळ एकाच हाताचा वापर करतो. आज तो एक व्यावसायिक चित्रकार म्हणून उदयास येत आहे.