Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर, दि.26:  सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही देतानाच जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मुख्य  शासकीय ध्वजवंदन कार्यक्रमात ते बोलत होते. पोलीस आयुक्तालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते.

पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते सकाळी 9:15 वाजता ध्वजवंदन झाले. त्यानंतर संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. पालकमंत्री भरणे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातातील उत्कृष्ठ अधिकारी, कर्मचारी, उत्कृष्ठ खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला.

श्री. भरणे म्हणाले, ‘गेले वर्षभर कोरोना महामारीशी लढण्यात गेले. मात्र विकासाची गती कायम राहिली यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून रस्ते, जलसिंचन, शेती, सहकार, उद्योग अशा विविध क्षेत्रातील विकास होईल असा मला विश्वास आहे’.

पालकमंत्री भरणे म्हणाले, ‘गेल्या वर्षभरात जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी अतिशय मोलाचे काम केले आहे. त्यांच्या या कामामुळेच सोलापूर जिल्ह्यातील कोरोनावर नियंत्रण आणण्यात यश मिळाले आहे. आता लसीकरणाची मोहीम सुरु झाली आहे. या मोहिमेचे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने अतिशय चांगले नियोजन केले आहे. या लसीकरणाला नागरिकांनी सहकार्य करावे. लसीकरणाची मोहीम यशस्वी करुया आपला जिल्हा कोरोनामुक्त करुया’.

यंदा अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतीचे घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नुकसानभरपाईपोटी  राज्य शासनाकडून 250 कोटी रुपयांचा मदत निधी वितरित करण्यात आला आहे. आणखी 250 कोटी रुपये प्राप्त झाले असून त्याचेही वितरण लवकरच केले जाईल. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची ग्वाही देतो, असे श्री. भरणे यांनी सांगितले.

जिल्हा ग्रामीण पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कार्यालये व पोलीस ठाणे हद्दींच्या अद्ययावत नकाशांचे अनावरण श्री. भरणे यांच्या हस्ते झाले.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त दीपाली घाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्यासह स्वातंत्रसैनिक, विविध क्षेत्रातील मान्यवर,  महसूल, पोलीस, आरोग्य, सहकार, क्रीडा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम अशा विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन मेघा शिर्के-होमकर यांनी केले.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या तर नवीन प्रशासकीय इमारत येथे अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *