सोलापूर – महाराष्ट्रामध्ये समृद्ध पक्षी वैभव आहे. हे वेेैभव आपल्या कॅमऱ्यात टिपण्यासाठी सोलापुरातील एक प्रसिद्ध डॉक्टर पक्ष्यांच्या सहवासात घालवतात, त्यांच्या चिवचिवाटात विरघळून जातात, निरनिराळ्या पक्ष्यांच्या छबी कॅमेऱ्यात टिपून त्या दोन भाषांतील नावांसह सुमारे दोन हजार निसर्गप्रेमींपर्यंत दररोज पोहोचवित असतात. डॉ. व्यंकटेश मेतन असं त्यांच नाव आहे.
पेशाने अस्थिरोग तज्ज्ञ असलेले डॉ. व्यंकटेश मेतन हे सामाजिक कार्यात नेहमी पुढे असतात. मेतन फाऊंडेशनच्या माध्यमातून ते विविध सामाजिक उपक्रम राबवितात. १९९६ पासून त्यांना पक्षीनिरीक्षणांची अावड निर्माण झाली. गेल्या १२ वर्षापासून ते फोटोग्राफी करत अाहेत. डॉ. मेतन यांना एकेदिवस हिपरग्गा तलाव येथे रोहित पक्षी दिसला. तो पक्षी पाहून डॉक्टरांना पक्ष्यांविषयी प्रेम निर्माण झाले. त्यानंतर ते पक्ष्यांच्या प्रेमात आकंठ बुडाले आणि पक्षी निरीक्षणाचा छंद जडला.
जमेल तिथे आणि जमेल तसे ते पक्षी निरीक्षणासाठी जाऊ लागले. सुरवातीला संभाजी तलाव, एकरुख तलाव, सिद्धेश्वर वनविहार, सोलापूर विद्यापीठ परिसरात ते नित्यनियमाने पक्षी निरीक्षणासह निसर्गभ्रमंतीसाठी जात. अल्पावधीतच पक्षी निरीक्षणाची नजर तयार झाली आणि कोणालाही सहज न दिसणारे, पानापानांमध्ये लपलेले छोटे-मोठे पक्षी नजरेच्या टप्प्यात येऊ लागले.
पक्ष्यांची चोच, पंजे, रंगछटा सुस्पष्टपणे दिसाव्यात यासाठी महागडा कॅनॉन 1 डी एक्स विथ ६०० एम एम प्राईम लेन्स हा कॅमेरा खरेदी केला. याच भटकंतीत ते पक्ष्यांच्या असंख्य छबी टिपतात. हे फोटो ते देश-विदेशातील पक्षीमित्र, वर्ग मित्र, महाविद्यालयीन मित्र, परिचित, नातेवाईक, कुटुंबीय, डॉक्टर मंडळींच्या ग्रुपसह इतर अनेक व्हाट्सॲप ग्रुपवर दररोज न चुकता पाठवतात. छायाचित्रांसोबत त्या पक्ष्यांची मराठी व इंग्रजीतील नावे असतात. त्यामुळे इतरांच्या ज्ञानात भर पडत आहे.
डॉक्टरांनी काढलेले पक्ष्यांचे काही फोटो सोलापूरतील सिद्धेश्वर वनविहार येथे पक्षी अभ्यासकांसाठी ठेवण्यात आली आहेत. त्यांनी चित्रकला परिषद बेंगलोर गॅलरी आणि जहाँगीर आर्ट गॅलरी येथे सोलापूरातील वन्यजीवांचे छायाचित्र प्रदर्शन भरविले होते.
या देशांची केली जंगल सफारी
पक्षी निरीक्षणासाठी त्यांनी इजिप्त, भूतान, इक्वेडोर, ॲमेझॉन, आफ्रिकेच्या तीन सफारी पूर्ण केल्या आहेत. भारतात एकूण जवळपास पक्ष्यांच्या १२५९ जाती आहेत, त्यापैकी ६६१ पक्षांचे फोटो त्यांच्याकडे संग्रहही आहेत. देशातील पाणवठे, शेत, तलाव, माळराने, जंगलातील बराच भाग म्हणजे जवळपास ६५ टक्के परिसर या हौशी पक्षीमित्रांने पिंजून काढला. हजारोंच्या घरात पक्ष्यांच्या नोंदी मिळविल्या. पक्ष्यांच्या नावासाठी डॉ. सलीम अली यांच्या ‘भारतीय पक्षी’ या पुस्तकांचा ते आधार घेतात.
पक्षी निरीक्षण आणि अभ्यास केंद्र होणार. . .
पक्ष्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आणि संवर्धनासाठी योग्य पावले उचलली जावीत या उद्देशाने जिल्ह्यातील पक्षीमित्रांसाठी शहरातील हिप्परगा तलाव येथे पक्षी अभ्यास केंद्र आणि पक्षी निरीक्षण केंद्र लवकरच उभारण्यात येणार आहे. प्रशासनाकडून कार्यवाही जोरात सुरु असल्याचे डॉ. मेतन यांनी सांगितले.