Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

विशेष प्रतिनिधी /सोलापूर

सोलापूर शहर परिसर आयपीएल सट्टा बाजार जोरात असल्याची वृत्तमालिका MH 13 न्यूजवर प्रकाशित होत आहे.त्याची दखल घेऊन शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार क्राईम ब्रांचने धडाकेबाज कारवाई करून आयपीएल कंपनीच्या दांड्या उडवल्या आहेत .परराज्यातील असलेलं कनेक्शन ट्रॅक लावून गुन्हे शाखेने उध्वस्त केले. पण यातील मुख्य सूत्रधार अजून जाळ्यात अडकले नाहीत.प्लेयर सापडले कॅप्टन अजून सुरक्षित आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की…

सोलापूर शहर परिसरात आयपीएल सट्टा बाजार जोरात सुरू आहे. आणि त्यामुळे अनेक फसलेल्या युवकांचे बळी गेले तर, दुकानदारांची दुकाने तर अनेकांची घरे गहाण ठेवण्यात आली .सोलापुरातील या सट्टेबाजांची साडेसाती नष्ट व्हावी यासाठी पोलीस आयुक्तांनी कारवाई करावी अशी मागणी सोलापूरकर करत होते. कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथून क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश करून आंतरराज्य टोळी उघडकीला आणली आहे.

आज सोमवारी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार क्राईम ब्रँचने मोठी धडाकेबाज कामगिरी बजावली.

क्राईम ब्रँचचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी त्यांच्या पथकातील टीमच्या मदतीने सहा नोव्हेंबर रोजी अवंती नगर भाग 2 मधील पर्ल हाइट्स फ्लॅट नंबर 2 याठिकाणी छाप्याची कारवाई करून आरोपी चेतन रामचंद्र वन्नाल( वय 26 वर्षे राहणार -गांधी नगर झोपडपट्टी नंबर 3 व्यंकटेश मेडिकल शेजारी अक्कलकोट रोड )आणि विघ्नेश नागनाथ गाजूल (वय 24 वर्ष राहणार 1307 भद्रावती पेठ, सोलापूर हे आयपीएल क्रिकेट सामन्यांवर आयपीएल सामना चालू असताना टीव्हीवर चालू क्रिकेट मॅच पाहत टॉस कोण जिंकेल? सहा -दहा-पंधरा आणि 20 ओव्हस म्हणजेच सेशन मध्ये किती रन होतील आणि शेवटी सामना कोणती टीम जिंकेल यावर मोबाईलद्वारे दररोज सट्टा लावणाऱ्या लोकांकडून फोनवर सट्टा घेऊन त्याचा हिशोब पाहत- लिहीत असताना सापडले. या दोघांना सट्टेबाजांकडून जमा होणारी रक्कम आणि त्यांना मिळालेली रक्कम यामध्ये लाखो रुपयांचा लाभ सट्टा चालणाऱ्या या मालक आणि भागीदार यांना होत होता. यामधील बाकीचे भागीदार हे बक्षिसाची रक्कमेचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करत होते. तसेच कोरोना संसर्गजन्य परिस्थितीमध्ये स्वतःची आणि इतरांची जीवित आणि व्यक्तिगत सुरक्षितता धोक्यात आणून साथीच्या रोगाचा संसर्ग पसरण्याची कृती करत असल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा या नुसार गुन्हा दाखल केला आहे. याचा पुढील तपास क्राईम ब्रँच करत आहे

असा लावला ट्रॅप..

आरोपी चेतन रामचंद्र वन्नाल,(वय 26 वर्षे,रा.गांधी नगर झोपडपट्टी नंबर 3, व्यंकटेश मेडिकल शेजारी,अक्कलकोट रोड,सोलापूर याने दिलेल्या माहितीवरून संजय तू.साळुंखे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा सोलापूर शहर यांनी क्राइम ब्रँचचे पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह पुरुष व महिला अंमलदारासह गुलबर्गा येथे जाऊन पोहोचली.या ठिकाणी MH 13 पासिंग असणारी चारचाकीने लक्ष वेधून घेतले.त्याच क्षणी सावज हाती लागत असल्याचे लक्षात आले.

असा सापडला मुद्देमाल

बसवेश्वर नगर गुलबर्गा येथील घरातून आरोपी अतुल सुरेश शिरशेट्टी रा. अवंती नगर सोलापूर व प्रदीप मल्लय्या कारंजे (रा.75/22, भवानी पेठ, )सोलापूर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 3 लॅपटॉप,1 टॅब, 13 मोबाईल हँडसेट ,एक माईक, तीन लॅपटॉप चार्जर ,एक हॉट लाइन मशीन, 13 मोबाईल जोडलेले असलेला ,मोडेम ,सेट-टॉप-बॉक्स, सॅमसंग कंपनीचा मोठ्या आकाराचा टी.व्ही., डी.व्ही.आर.इ 3,33,200/- रुपये किमतीचे आयपीएल सट्टा खेळण्याकरिता वापरात येणारे साहित्य व अंदाजे 30 लाख किंमतीची वाहने त्यात एक टाटा कंपनीची इनोवा क्रिस्टा कार तिचा क्रमांक के.ए. 51 एम.पी.9955 व मारुती सुझुकी ब्रिझ्झा तिचा क्रमांक एम एच 13 डी.इ.7172 जप्त करण्यात आलेली आहेत.

आत्तापर्यंत सदर गुन्ह्यात वापरलेली वाहने सट्टा खेळण्यासाठी लागणारे साहित्य व 3,40,000/- रोख रक्कम असा मिळून एकूण 38,44,200 /- रुपयांचे( 38 लाख 44 हजार दोनशे रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात तपासात अटक आरोपींकडे केलेल्या तपासा दरम्यान महाराष्ट्र व कर्नाटकातील शहरात असलेल्या एजंटाकरवी IPL क्रिकेट सट्टा स्वीकारलेला आहे व एजंटांमार्फत सर्वसामान्य माणसाला जास्तीचे पैसे देण्याचे आमिष दाखवून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सर्वसामान्य लोकांची फसवणूक केल्याची माहिती उजेडात आलेली आहे. तपास अधिकाऱ्यांनी यातील आरोपी अतुल शिरशेट्टी आणि प्रदीप कारंजे यांनी वापरले लॅपटॉप, मोबाईल मध्ये असलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्याकडे कौशल्याने तपास करून गुन्ह्यातील पुरावा हस्तगत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त गुन्हे बापू बांगर, सहा. पोलीस आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा संजय तू.साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल औदुंबर आटोळे, दिलीप नागटिळक, पोलिस नाईक जयसिंग भोई, पोलीस कॉन्स्टेबल संजय साळुंखे, सिद्धराम देशमुख, गणेश शिंदे, सागर गुंड, विद्यासागर मोहिते, सोमनाथ सुरवसे, अश्रूभान दुधाळ, कुमार शेळके, सनी राठोड, सुरज देशमुख, महिला पोलीस कॉन्स्टेबल आरती यादव, चालक पोना राहुल गायकवाड, नेताजी गुंड या पथकाने केली आहे.

या दणकेबाज कारवाईमुळे सोलापुरातील आयपीएल बुकीसह,बीडर,कॅप्टन यांचे धाबे दणाणले आहे .पण आयपीएलचा मास्टर माईंड कधी सापडणार याकडे सोलापूरकर यांचे लक्ष लागून राहिले आहे.बेटिंग होणाऱ्या आयपीएल सामन्याचे फायनल कोण जिंकणार याची उत्सुकता देशभरात असली तरी सोलापुरातील फायनल क्राईम ब्रँच जिंकेल असा आत्मविश्वास क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांच्या,कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *