नवी दिल्ली,दि.30 : ब्रिटन मधून आलेल्या एकूण 20 जणांमध्ये सार्स-सीओव्ही-2 हा नविन स्वरुपातील विषाणू (नवीन म्युटंट व्हेरिएन्ट) आढळला आहे. यात यापूर्वी नोंदवलेल्या सहा जणांचा समावेश आहे (निम्महंस, बेंगलोरमधील तीन, सीसीएमबी, हैदराबादमध्ये दोन आणि एनआयव्ही, पुणे मधील एक)
भारत सरकारने जीनोम सिक्वेंसींगसाठी 10 प्रयोगशाळांचा (एनआयबीएमजी कोलकाता, आयएलएस भुवनेश्वर, एनआयव्ही पुणे, सीसीएस पुणे, सीसीएमबी हैदराबाद, सीडीएफडी हैदराबाद, इंस्टेम बेंगलुरू, निमहंस बेंगलुरू, आयजीआयबी दिल्ली, एनसीडीसी दिल्ली) समावेश असलेल्या आयएनएसएसीओजी (इंडियन सार्स-सीओव्ही-2 जेनोमिक्स कन्सोर्टियम) ची स्थापना केली आहे. परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली जात आहे आणि देखरेख, नियंत्रण, चाचणी वाढविण्यासाठी आणि आयएनएसएसीओजी प्रयोगशाळांमध्ये नमुने पाठविण्यासाठी राज्यांना नियमित सल्ला दिला जात आहे.
मागील 33 दिवसांपासून दररोज नोंद होणाऱ्या नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. गेल्या 24 तासांत, देशात 20,549 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे आढळले. याच कालावधीत, सक्रीय रुग्णसंख्येत घट झाल्याची नोंद झाली असून 26,572 नवीन रुग्ण बरे झाले आहेत.
भारतातील एकूण बरे झालेल्यांची सख्या 98,34,141 झाली आहे. जागतिक पातळीवर हा आकडा सर्वोच्च आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचा दर देखील जवळजवळ 96% (95.99%) वर पोहोचला आहे. बरे होणारे रुग्ण आणि सक्रिय रुग्णांमधील दरी सातत्याने वाढत आहे (95,71,869).
भारतातील एकूण 2,62,272 सक्रीय रुग्णांच्या तुलनेत बाधित रुग्णांचे प्रमाण केवळ 2.56 टक्के आहे. नवीन बरे होणाऱ्या रुग्णांमुळे एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येत 6,309 ची घट झाली आहे.
जागतिक पातळीवर तुलना केली तर भारतातील प्रती दशलक्ष लोकसंख्येमागील रुग्णांची नोंद जगातील सर्वात कमी (7,423) रुग्णसंख्येपैकी आहे. रशिया, इटली, ब्रिटन, ब्राझील, फ्रान्स आणि अमेरिके सारख्या देशांमध्ये दर दशलक्ष लोकसंख्येतील रुग्णांचे प्रमाण जास्त आहे.
बरे झालेल्यांपैकी 78.44 % रुग्ण 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.
महाराष्ट्रात एका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 5,572 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले असून केरळमध्ये 5,029 आणि छत्तीसगडमध्ये 1,607 जण बरे झाले.
नव्या रुग्णांपैकी 79.24% रुग्ण 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत.
केरळमध्ये दैनंदिन सर्वात जास्त म्हणजे 5,887 कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रात 3,018 आणि पश्चिम बंगाल मध्ये 1,244 रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात 286 मृत्यूंची नोंद झाली.
या पैकी सुमारे 79.37% मृत्यू 10 राज्य/ केंद्र शासित प्रदेशातले आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे दैनंदिन 68 मृत्यूंची नोंद झाली. पश्चिम बंगाल मध्ये 30 आणि दिल्ली मध्ये 28 मृत्यूंची नोंद झाली.
भारतात दैनंदिन मृत्यू संख्येत घट होत आहे. दहा लाख लोकसंख्येमागे 107 जणांचा मृत्यू हा भारतातला आकडा जगातल्या सर्वात कमी आकड्यापैकी एक आहे.