सोलापुर येथील कुमठे परिसरात महालक्ष्मी नगर येथे पती- पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा, असा लक्ष्मीबाई माने यांचा सुखाचा संसार सुरु होता. मात्र, लक्ष्मीबाई यांच्या पतीचा पाच वर्षांपूर्वी आकस्मित मृत्यू झाला होता. त्यानंतर एका मुलीचाही मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले. तर लक्ष्मीबाई यांच्या दुसऱ्या मुलीचा कर्नाटकातील तोरवी येथे विवाह झाला. तिच्यासोबत राहायला भाऊही गेला. एकट्या राहणाऱ्या लक्ष्मीबाईचे अनैतिक संबंध जावयासोबतच जुळले. त्याची माहिती मुलीला मिळाली आणि मुलीने तिच्या दिरासोबतच अनैतिक संबंध ठेवायला सुरुवात केली. मात्र, मुलीचे दिरासोबत असणारे अनैतिक संबंध आईला मान्य नव्हते त्यामुळे आईने अनैतिक संबंधाला विरोध केल्याने मुलीने प्रियकराच्या मदतीने आईलाच संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली आहे.
लक्ष्मीबाईंचा मृत्यू झाल्याची खबर त्यांच्या नणंद कविता भोसले यांना समजली. त्यांनी तात्काळ नणंदेच्या घरी जाऊन पहिले असता, लक्ष्मीबाई ह्या निपचित पडल्या होत्या. दरम्यान कविता भोसले यांना खूनाचा संशय आल्याने त्यांनी विजापूर नाका पोलिसांत जाऊन आपली फिर्याद दिली. सदर घटनेची तात्काळ दखल घेत विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उदसिंह पाटील, सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी चौहूबाजूंनी कानोसा घेतला असता, हा खून अनैतिक संबंधातून झाला असावा असा त्यांना संशय आला.
पोलिसांनी शेजारील व्यक्तींची चौकशी केली असता लक्ष्मीबाईंच्या मृत्यूच्या आदल्यादिवशी त्यांची मुलगी व दिर घरी आल्याचे समोर आले होते. त्यानंतर शितलकुमार कोल्हाळ यांचे पथक तोरवी येथे पोहचले. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली. त्यानंतर सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी त्या दोघांचीही रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली असल्याची माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे.