सोलापूर, दि.15- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या शुक्रवार, दि. 16 ऑक्टोबर 2020 रोजी होणाऱ्या ऑनलाइन व ऑफलाइन सर्व परीक्षा मोबाईल इंटरनेट कनेक्टिव्हिटी व नैसर्गिक आपत्तीमुळे दि. 18 ऑक्टोबर 2020 रोजी पूर्वनियोजित वेळेनुसार होतील, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक श्रेणीक शहा यांनी दिली.
गेला तीन-चार दिवसांपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात अतिवृष्टी होत असून यामुळे वीजपुरवठा खंडित झालेला आहे. त्याचसोबत विविध मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क विस्कळीत झाले आहेत तर काही कंपन्यांचे मोबाईल पूर्णतः बंद झालेले आहेत. पंढरपुर, मंगळवेढा, वेळापूर भागातही यासंदर्भात अतिवृष्टीमुळे समस्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा देता येणार नाही. दोन महत्त्वपूर्ण कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क पूर्णता बंद असल्याचे विद्यापीठास सांगण्यात आले आहे. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाकडून दि. 16 ऑक्टोबर रोजी घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा दि. 18 ऑक्टोबर 2020 रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
त्याचबरोबर दि. 14 ऑक्टोबर रोजी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा 19 ऑक्टोबर रोजी तर दिनांक 15 ऑक्टोबर रोजी घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा या 20 ऑक्टोबर 2020 रोजी घेतल्या जाणार आहेत, तरी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा सुधारित वेळापत्रकानुसार द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 14 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात ज्या विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे परीक्षा दिलेली आहे, अशा विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा देण्याची गरज नाही, असेही विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.