मुंबई,दि.24 : अंमलबजावणी संचालनालयाची पथकं आज सकाळी आठ वाजता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात पोहोचली आणि शोधमोहीम सुरु केली. मुंबई, ठाणे परिसरातील दहा ठिकाणी ईडीकडून शोध सुरु आहे. टॉप ग्रुपसंबंधी ही कारवाई केली जात आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरु आहे. दरम्यान प्रताप सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयात ईडीची पथकं दाखलं झाली असून शोधमोहीम सुरु आहे. या कारवाई विरोधात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात निषेध करुन भाजप आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. “सीबीआय, ईडी काहीही असू द्या, हे सरकार, आमदार आणि नेते कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहित आहे,” असं राऊत म्हणाले.
खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या या कारवाईचा निषेध केला. ते म्हणाले की, “सीबीआय, ईडी काहीही असू द्या, हे सरकार, आमदार आणि नेते कोणालाही शरण जाणार नाहीत. आम्ही लढत राहू. हे सरकार पुढील चार वर्षेच नाही तर त्यानंतरची 25 वर्षे सत्तेत राहिल. यंत्रणांचा वापर करुन सरकारवर दबाव आणून आणि आमदारांचं मनोधैर्य कमी करु इच्छिणाऱ्यांना लक्षात घ्यावं की हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ही काळ्या दगडावरची रेष समजा, पुढची 25 वर्ष तुमचं सरकार येईल हे स्वप्न विसरुन जा. आज जर तुम्ही सुरुवात केली असेल तर शेवट कसा करायचा हे आम्हाला माहित आहे.