प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्याचा मंदिर समितीने घेतला निर्णय
(प्रतिनिधी अक्कलकोट) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात प्रतिवर्षी २५ डिसेंबर ते २ जानेवारी अखेर नाताळ सुट्टया, दत्त जयंती, व नुतन वर्षानिमीत्त दरवर्षी प्रमाणे यंदाही स्वामी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यातच शुक्रवार दिनांक २५ डिसेंबर २०२० रोजी यंदा नाताळ सणाची सुट्टी, शनिवार दिनांक २६ व रविवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सलग शासकीय सुट्टया आहेत. मंगळवार दिनांक २९/१२/२०२० रोजी श्री दत्त जयंती आहे. गुरूवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षास निरोप व शुक्रवार दिनांक १ जानेवारी २०२१ रोजी नुतन वर्षाची सुरूवात इत्यादी सलग गर्दीचे दिवस लक्षात घेवून कोरोना संसर्गाचा फैलाव होवू नये म्हणून प्रशासनाने गुरूवार दिनांक २४/१२/२०२० च्या मध्यरात्री पासून शनिवार दिनांक २ जानेवारी २०२१ च्या मध्यरात्री पर्यंत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान बंद ठेवण्याचे व भाविकांना अक्कलकोट शहरात प्रवेश मनाई करण्याचे लेखी पत्राद्वारे आदेश दिले आहेत.
त्यानुसार आज दिनांक २५ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून ते दिनांक २ जानेवारीच्या मध्यरात्री पर्यंत वटवृक्ष मंदीर पुन्हा एकदा बंद करण्यात आले असल्याची माहीती मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी दिली.
या कालावधीत कोणत्याही स्वामी भक्तांनी स्वामी दर्शनाकरीता मंदीराकडे येण्याचे टाळावे व स्वामी भक्तांनी आपल्या घरीच थांबून स्वामींची आराधना करावी असे आवाहनही इंगळे यांनी याप्रसंगी स्वामी भक्तांना केले आहे.
Leave a Reply