सोलापूर जिल्ह्यातील सुयश जाधव यांस भारत सरकारच्या युवा कल्याण व क्रीडा मंत्रालयाने सन २०२० च्या अर्जुुन पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला हा प्रकाश. . .
करमाळा तालुक्यातील पांगरे हे गाव. याच गावातील सुयश नारायण जाधव यांची गोष्ट. वडील व्यवसायाने शिक्षक आणि राष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटूही. नोकरीच्या निमित्ताने ते माळशिरसमधील वेळापूर येथील न्यु इंग्लिश स्कुलमध्ये आले होते. त्यामुळे सुयशचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा वेळापुर येथे झाले. सर्व काही ठिकठाक असताना अचानक एके दिवशी आभाळाएवढा संकट कोसळले.
वयाच्या ११ व्या वर्षी खेळत असताना वीजेचा धक्का बसला आणि या दुर्घटनामध्ये त्याला दोन्ही अर्धे हात गमवावे लागले. आणि कायमचे दिव्यंगत्व आले. तरीही तो खचला नाही. त्याला लहानपणापासुनच जलतरणाची मोठी आवड. वयाच्या तिसर्या वर्षापासून तो जलतरणाची बाराखडी गिरवत होता. यासाठी आई आणि वडीलांनी त्याला प्रोत्साहन आणि पाठबळ दिले. राष्ट्रीय पातळीवरील खेळाचा अनुभव असलेल्या त्याच्या वडिलांनी त्याला धडे देण्यास सुरुवात केली.
वडीलांना गुरू मानून सुयशदेखील चिकाटीने पोहण्याचा सराव सुरू केला. परिस्थितीने दिव्यंगत्व आल्यानंतरही निराश न होता सुयश याने जिद्दीच्या जोरावर अफाट परिश्रम घेतले. बेंगलोर येथे राहून काही दिवस राहून तो धडे घेऊ लागला. रोज पहाटे ४ वाजता उठून तो सराव करायचा. पुढे तो जलतरण क्रीडा प्रकारात नैपुण्य प्राप्त करीत जलतरण क्रीडा प्रकारात भाग घेण्यास सुरवात केली. दिव्यांग या प्रकारात पॅरा जलतरणपटू मध्ये त्याने दैदिप्यमान यश मिळवले आहे.
क्रीडा स्पर्धेत कारकीर्दी घडविण्याचे ठरविल्यानंतर त्याने अभ्यासाकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. सुयश अभ्यासातही हुशार. माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल वेळापुर येथून पूर्ण केले. दहावीमध्ये चक्क ८७ टक्के गुण मिळवले. उच्च माध्यमिक शिक्षण शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलुज येथे तर महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथून पूर्ण केले. सुयशने बालवयातच घेतलेल्या कष्टाचे चीज झाले. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा प्रकारात तो यश मिळवू लागला.
आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्याने सुवर्ण झेप घेतली. सुयशने आशियाई पॅरागेम्समध्ये सुवर्ण पदक पटकावले. जागतिक जलतरण चॅम्पियनशीप स्पर्धेत दोन वेळा सहभाग घेतला. त्याने आतापर्यंत राज्यस्तरीय ५१ पदके, राष्ट्रीय स्तरावर ४६ पदके तर आंतरराष्ट्रीय स्तरावर २२ अशी एकूण ११९ पदकांची कमाई केली आहे. रियो, ब्राझील येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत २ सेकंदाने पदकाने हुलकावणी दिली.
त्याचा हा प्रवास थक्क करणारा आहे. टोकियो येथे होणाऱ्या ओलंपिक स्पर्धेसाठी तो पात्र झाला आहे. पुढील वर्षी टोकियो २०२१ मध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे जलतरणमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करेल. या स्पर्धेत भारताला पदक मिळवून देण्याचे स्वप्न त्याने बाळगले आहे.
दिव्यांगावर मात करत आंतरराष्ट्रीय पातळीवर छाप टाकणाऱ्या सुयशच्या कामगिरीला राज्य शासनाने देखील विविध पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. २०१६ साली राज्यशासनाच्यावतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगिरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते ५० लाख रु व एकलव्य पुरस्कार देेेेवुुुन सुयश जाधव यास सन्मानित केले. तसेेच केंद्र शासनााने २०१८ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५० लाख रु देेेऊन सन्मान केला. तसेच क्रीडा क्षेत्रातील घवघवीत यशामुळे राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा मानाचा शिवछत्रपती राज्यस्तरीय पुरस्कारही त्याला मिळाला आहे.
शासनाने त्याच्या आत्तापर्यंतच्या पराक्रमाची दखल घेतली आणि वर्ग १ च्या जिल्हा क्रीडा आधिकारीपदी नियुक्ती केली आहे. सध्या ते बालेवाडी पुणे येथे क्रिडाधिकारी वर्ग १ या पदावर कार्यरत आहेत. सुयश जाधव यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णयश मिळवल्याने त्याला रोख रु.१५ लाख व अर्जुनाची कास्य प्रतिमा राष्ट्रपती रामानंद कोविंद यांच्या हस्ते क्रीडा दिनी २९ ऑगस्ट २०२० रोजी राष्ट्रपती भवनात गौरविण्यात आले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णझेप घेणाऱ्या सुयशची वाटचाल देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.