सोलापुरात चाळीस महिला रिक्षाचालक…
सोलापूर खूप बदलतंय याच्या वेगवेगळ्या स्तरावर आता खाणाखुणा गडद होवू लागल्यात. कालपरवा पर्यंत दिवसाढवळ्या एकट्या दुकट्या महिलेने रिक्षाने प्रवास करणे देखील ‘दिव्य’ समजले जात होते. तिथे आज चाळीस महिला रिक्षाचालक शहरात प्रवाशांना इप्सित स्थळी सुखरूप आणि सुरक्षित सोडण्याची सेवा बजावीत आहेत.
संसाराची बेरीज-वजाबाकीची गणितं सोडविताना रिक्षा चालविण्याची वेळ आली….अशी सहानुभूती मिळवणारी व्याख्या मांडण्यापेक्षा ‘करिअर’ म्हणून देखील ‘ती’ जर पुरुषांच्या बरोबरीने कोणत्याही क्षेत्रात पुढचे पाऊल टाकत असेल तर ती बदलाची नांदी म्हणायला काहीच हरकत नसावी.
रोजच्याच घाईत आसरा स्टॉपकडे घाईने जात असताना पाठीमागून एक हलकासा आवाज आला….भाऊ, कुठं जायचंय ?, मी मागे वळून पाहिलं तर एक महिला रिक्षा घेवून आलेली. मास्कमुळे अर्धा चेहरा झाकलेला असला तरी डोळ्यात याचना नाही तर कर्तव्याचा भाव दिसला.’भागवत थिएटरजवळ सोडता का ?’ म्हणून विचारलं तर जवळ रिक्षा थांबली. पटकन बसलो…एरवी किती घेणार ? म्हणून घासाघीस करण्याचा माझा ‘सोलापुरी बाणा’ केंव्हाच गळून पडला होता. माझ्या शहरात महिला रिक्षाचालक ही आता नाविन्याची गोष्ट नक्कीच राहिली नाही. रिक्षा चालविण्याची वेळ यावी अशी नक्कीच काहीतरी विपरीत घटना घडली असावी या विचाराने क्षणभर मनात सहानुभूतीचा विचार आला. पण सोबत बसणाऱ्या जोडप्याने ‘सोलापुरी बाणा’ दाखवीत भाड्याची घासाघीस सुरू केल्यावर आपण सोलापुरातच असल्याची खात्री झाली.
प्रातिनिधिक स्वरूपातच लिहावंसं वाटल्याने त्या भगिनीचे नाव देखील विचारावेसे वाटले नाही. नाही म्हणायला परवानगी घेवूनच पाठमोरा फोटो घेतला. ‘शहरात माझ्यासारख्या चाळीस जणी रिक्षा चालवितात’ हे सांगतांनाची सुरक्षिततेची भावना डोळ्यातून ओसांडतांना दिसत होती. नक्कीच माझं स्मार्ट सोलापूर आता मानसिकतेच्या पातळीवर बदलतंय याची खात्री पटली.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.