कराची : मुंबईवरील वर्ष 2008 मधील 26/11 च्या गाजलेल्या हल्ल्याचा सूत्रधार, कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला पाकिस्तानच्या पंजाब न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक पुरवठा करण्याच्या दोन प्रकरणांत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावेळी दहशतवादी हाफिज सईदसमवेत जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेच्या चार अन्य सदस्यांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
संयुक्त राष्ट्रांनी हाफिज सईदला मोस्ट वाँटेड दहशतवादी घोषित केल्यानंतर गेल्या वर्षी 17 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली होती. हाफिज सईदसह त्याचे दोन साथीदार जफर इकबाल आणि याह्या मुजाहिद या दोघांना 10 वर्ष सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर हाफिजचा नातेवाईक असलेल्या अब्दुल रहमान मक्की याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.