हृदयद्रावक घटना | दोन भाच्यांना वाचवताना मामाचा मृत्यू
बोरगाव (दे )येथे तिघांचा विहिरीत बुडून मृत्यू
अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे. येथे पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा बुडून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान गावाजवळच्या सुधाकर पाटील यांच्या शेतातील विहिरीत ही दुर्घटना घडली. अविवाहित शिवराम मोतीराम गवळी (वय २६ रा. बोरगाव ता अक्कलकोट), युवराज सुनील छत्रबंद (वय १४ रा. सोलापू), समर्थ बंडू धर्मसाले (वय १६ रा.माकणी ता लोहारा) असे मृत झालेल्यांची नावे आहेत.
O
बोरगांव दे येथे मोतीराम गवळी यांच्या घरी कार्यक्रम होते. त्यामुळे घरातील नातेवाईकांसोबत हे तिघे ही तिथे गेले होते. पोहण्यासाठी पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज आला नाही. युवराज सुनील छत्रबंद व समर्थ बंडू धर्मसाले या दोघांना पोहता येत नसल्याने मामा शिवराम गवळी हा आपल्या भाच्यांना वाचवण्यासाठी विहरीत गेला असता त्याचा ही विहरीत बुडून मृत्यू झाला. गावकऱ्यांच्या मदतीने तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मोतीराम गवळी यांना दोन मुले, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. त्यापैकी मयत शिवराम हा पुणे येथे खासगी कंपनीत कामावर होता. घरगुती कार्यक्रम असल्याने सुट्टी घेऊन चार दिवसांपूर्वीच बोरगांवला आला होता. घटनेची माहिती समजताच नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली.
आजी – आजोबाकडे आलेल्या नातवंडावर काळाने झडप घातली. आपल्या सख्या मामासोबत दोन्ही भाच्याचा पाण्यात मामासह बुडून मृत्यू झाल्याने बोरगांव दे गावावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी आजी आजोबांसह नातेवाईकांनी आक्रोश केला. घटनास्थळी पोलीस हवालदार अजय भोसले व पोलीस नाईक अरुण राऊत यांनी भेट दिली. उत्तरीय तपासणीसाठी अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आले.अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात मयताची नोंद झाली असुन खबर बंडोपंत धर्मसाले यांनी दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत.