Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

राज्यात सुरु असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 10 वी ते 12 वी वर्ग उशिरा चालू करण्यात आल्यामुळे 10 वी व 12 वीच्या परीक्षेसंदर्भात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. तत्पूर्वी ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले होते. मुळात शाळा उशिरा सुरू करण्यात आलेल्या 10 वी व 12 वीच्या परीक्षेसंदर्भात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे.

काेराेना संसर्गामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षात काही अडसर निर्माण झाले. मात्र, यावर मात करून यंदा बारावी व दहावीच्या परीक्षा नेहमीच्या पद्धतीनेच, परंतु काहीशा उशिरा म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यासंदर्भात विचारविनिमय सुरू असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षाचे महत्त्व लक्षात घेऊन प्राधान्याने त्यांचा अभ्यास व परीक्षा पद्धतीचा विचार शिक्षण विभाग करत आहे, ज्यामुळे पुढील वर्षी बोर्डाच्या परीक्षेत त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या संदर्भात शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण तज्ज्ञांशी विचारविनिमय सुरू असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यात 23 नोव्हेंबरपसून 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरू झाले असून, 5 लाखांहून अधिक विद्यार्थी उपस्थिती राहत आहेत, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये 9 वी ते 12 वीचे वर्ग सुरळीत सुरू झाले आहेत. दिवसागणिक या वर्गांमधील विद्यार्थी संख्यादेखील वाढत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाने विद्यार्थी व शिक्षक संक्रमित झाले नाहीत. मात्र, लहान मुलांना शाळेत सामाजिक अंतर व आरोग्यविषयक सूचनांचे पालन करणे तितकेसे सहज शक्य नसल्याने सध्या पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी आम्ही अद्याप कोणतीही भूमिका मांडली नसल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *