Big 9 News Network
1 मे 2021 पासून भारत सरकारने 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांचा लसीकरणा मध्ये समावेश केलेला आहे. लाभार्थ्यांची वाढलेली संख्या व होणारा लस पुरवठा यामधील तफावतीच्या पार्श्वभूमीवर सीईओ स्वामी यांनी परिपत्रक काढून लसीकरण कार्यक्रमाबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामुळे लसीकरणा मध्ये येणाऱ्या अडचणी व निर्माण होणारा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे.
परिपत्रकातील मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे..
1) 18 ते 44 वयोगटातील लाभार्थ्यांची cowin संकेत स्थळावर व आरोग्य सेतू ॲपवर नोंदणी करण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शिक्षकांवर राहील. याकामी मुख्याध्यापक व शिक्षकांना ग्राम विस्तार अधिकारी, ग्रामसेवक सहकार्य करतील व नोंदणीच्या कामातील आडी अडचणी सोडवण्यासाठी आरोग्य सेवक व समुदाय आरोग्य अधिकारी मदत करतील.
2) लाभार्थी नोंदणीचे रजिस्टर ठेवून ते दैनंदिन अद्ययावत करण्याची जबाबदारी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व आरोग्य सेवक यांची राहील.
3) लसीकरणासाठी वेळेची निश्चिती व time slot निवड करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात ग्रामसेवक व नागरी भागात मुख्याधिकारी नगरपरिषद यांची राहील याकामी आशा वर्कर व अंगणवाडी सेविका मदत करतील.
4) लसीकरणासाठी नागरिकांचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेला आहे.
अ) 60 वर्षे वयावरील नागरिक व दुसरा डोस देय असलेले (सहा आठवडे पूर्ण झालेले) नागरिक.
ब) 45 वर्षे वयावरील अति जोखमीचे नागरिक व पंचेचाळीस वर्षे वयावरील नागरिक.
क) 18 ते 44 वयोगटातील नागरिक.
5) लसीकरणासाठी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत प्राधान्यक्रमानुसार दैनंदिन लाभार्थ्यांना स्लीप दिली जाईल व स्लीप नुसारच प्राथमिक आरोग्य केंद्रात लस दिली जाईल. विना स्लीप कोणालाही लसीकरण करण्यात येणार नाही. स्लीप शिवाय लसीकरण न करण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकारी यांची राहील. त्याचप्रमाणे प्रा.आ केंद्र क्षेत्राबाहेरील नागरिकांना लस दिली जाणार नाही.
6) तालुका आरोग्य अधिकारी हे नागरी भागात वार्ड निहाय व ग्रामीण भागात गाव निहाय लोकसंख्येच्या आधारावर लस वाटप करतील.
7) लसीकरण सत्राच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी वैद्यकीय अधिकारी यांची राहील.
8) cowin संकेतस्थळावर व आरोग्य सेतू ॲप वर लाभार्थी नोंदणीचा दैनंदिन आढावा गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी हे घेतील.
तरी नागरिकांनी वरील सुविधेचा लाभ घेऊन दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन आपणास ठरवून दिलेल्या वेळेतच लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन सीईओ स्वामी यांनी केले आहे.