Big9news Network
बाळे भागातील आरोग्य केंद्र गेल्या तीन ते चार दिवसापासून मोठ्या चर्चेत होते. कधी लस उपलब्ध नसणे, तर पुढाऱ्यांच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांचे लसीकरण, महावितरण कर्मचाऱ्यांचा लसीकरण वाद ,पॉझिटिव्ह रिपोर्टबद्दल संशय, आरोग्य केंद्रात सोयी- सुविधा नसणे अशी एक ना अनेक कारणे त्याच्यासोबत होती.
सोलापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बाळे या परिसरातील सामाजिक,राजकीय कार्यकर्ते आनंद भवर यांनी येथील लसीकरण केंद्रावर गोंधळ घालून शासकीय कामात अडथळा केल्याने त्यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि इतर महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळे आरोग्य केंद्रात डॉ.प्रियांका शेटे या कार्य करत होत्या. त्यावेळी केंद्रावर काही जण कोरोना तपासणी करण्यासाठी आले.त्यातील अभिजित जाधव हा युवक पॉझिटिव्ह निघाला. त्या वेळी आनंद भवर हे तेथे येऊन जाधव हा पॉझिटिव्ह नाही. तुम्ही त्याची पुन्हा एकदा तपासणी करा, किंवा मला टेस्टिंग किट दाखवा असे म्हणू लागले.
यामुळे डॉ. शेटे यांनी त्याची पुन्हा तपासणी करता येणार नसल्याचे सांगितले. त्या वेळी आनंद भवर यांनी मी या भागातील भावी नगरसेवक आहे. तुम्हाला माझे ऐकावे लागेल, असे म्हणत मोठ-मोठ्या आवाजात वाद घालू लागले अशी प्रतिक्रिया डॉ.शेटे यांनी व्यक्त केली होती.
त्यानंतर शनिवारी सकाळी पुन्हा याच केंद्रावर वादास सुरुवात झाली .’काल तुम्ही नेता आनंद भवर यांना शिवीगाळ केली. यामुळे तुम्ही त्यांची माफी मागा अन्यथा तुम्हाला काम करू देणार नाही, असे म्हणत बाळे आरोग्य केंद्रातील डॉ. प्रियांका चंद्रकांत शेटे (वय २८) यांच्याशी हुज्जत घालत त्यांच्या ताब्यातील रजिस्टर फेकून सहा जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
यामध्ये आनंद भवर यांची पत्नी आरोपी अलका आनंद भवर व आरोपी लक्ष्मी बाळू भवर, शोभा नीलकंठ पांढरे, कल्पना तुकाराम भांगे,श्रद्धा स्वप्निल जाधव सर्व आरोग्य केंद्रात आले. तेथे अलका भवर म्हणाल्या, तुम्ही काल आनंद भवर यांना शिवीगाळ केली. तुम्ही त्यांची माफी मागा अन्यथा तुम्हाला काम करू देणार नाही. असे म्हणत बघून घेण्याची धमकी देत त्या व वरील सर्व आरोपी डॉ. शेटे यांच्या अंगावर धावून गेल्या व शेटे यांच्या हातातील रजिस्टर फेकून देत शासकीय कामात अडथळा केला.याच वेळी श्रद्धा जाधव यांनी जोरजोरात आरडाओरड करत गोंधळ घातला, अशा आशयाची फिर्याद डॉ. शेटे यांनी पोलिसांत दिलीय.
वाद मोठ्या प्रमाणावर वाढल्याने महापालिका उपायुक्त धनराज पांडे ,फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट, पोलीस निरीक्षक सोमनाथ देशमाने, सचिन मंद्रूपकर, यांच्यासह महिला पोलिसांचा फौजफाटा बाळे आरोग्य केंद्रावर आला. त्यावेळी आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय काम करणार नाही असे ठासून सांगितले आणि काम बंद केले त्यामुळे काही वेळापुरते लसीकरण बंद करण्यात आले यावेळी महापालिका उपायुक्त पांडे यांनी दोषींवर पोलिसी कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले त्यानंतर लसीकरण करण्यास सुरुवात झाली. आनंद भवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय कर्मचारी फौजदार चावडी मध्ये जमा झाले होते .