सोलापुरातील अष्टविनायक ; वीरकर गणपती

श्री सिद्धरामेश्वर स्थापित अष्टविनायक

ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर महाराजांनी सोलापूरमध्ये (सोन्नलगी) शहरावर कोणतिही नैसर्गिक आपत्ती येऊ नये यासाठी स्वहस्ते स्थापन केलेल्या अष्टविनायकांची दिशा, निर्देशात्मक स्थान व त्यांची नावे यासंबंधीची तपशीलवार माहिती १३ व्या शतकात कर्नाटकातील हंपी येथे होऊन गेलेले विद्वान कवी राघवांक यांनी सिद्धरामाच्या चरित्रात लिहून ठेवली आहे.
राघवांक कवीने वर्णन केल्याप्रकरणी श्री गणेशाच्या सर्व आठही मूर्ती आजसुध्दा सोलापूरच्या आजूबाजूला पाहावयास मिळतात.

5) पाचवा गणपती
वीरकर गणपती
सम्राट चौक

पश्चिमेचा वीरकर गणपती
देशमुखांच्या मळ्यात शोभतो ।
रिध्दी-सिध्दी-सबुध्दी पुरवुनी
पशुपती तो स्वतः म्हणवितो ॥

ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर महाराजांनी स्वहस्ते स्थापन केलेला पाचवा गणपती म्हणजे वीरकर गणपती. सोलापूरच्या पश्चिम दिशेला सम्राट चौकाच्या अलीकडे बसवंती मंगल कार्यालयाच्या शेजारील बोळात या वीरकर गणपतीचे मंदिर आहे.
वीरकर गणपती देशमुख यांच्या जागेत असल्यामुळे त्यास देशमुख गणपती असेही म्हटले जाते. ‘श्रीं’ चे मंदिर अगदी नव्याने बांधण्यात आलेले आहे.
वीरकर गणेशाची मूर्ती ही चार फूट उंचीची प्रशस्त आणि अत्यंत रेखीव स्वरुपाची आहे. येथे दररोज ‘श्रीं’ च्या अंगावर अलंकार चढवून पूजाअर्चा व सकाळ-संध्याकाळ आरती करण्यात येते. यावेळी मंदिरात भाविकांची गर्दी असते. संस्कृत भाषेत वीरकर म्हणजे शूरबाहू असलेला बलदंड हाताचा असा होतो.
मंदिर परिसरात श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या 68 लिंगापैकी एक लिंग देखील आहे. नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी पेवर ब्लॉक घालून मंदिर परिसर सुशोभित केला आहे. मंदिरात वीरशैव व्हिजन या संस्थेच्या वतीने वीरकर गणपतीच्या आरतीचा फलक लावण्यात आला आहे.
ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या मकर संक्रांतीच्या वेळेस होणाऱ्या यात्रेचा प्रारंभ देखील या विघ्नहर्त्या वीरकर गणपतीच्या पूजनाने करण्यात येतो.