श्री सिद्धरामेश्वर स्थापित अष्टविनायक
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर महाराजांनी सोलापूरमध्ये (सोन्नलगी) शहरावर कोणतिही नैसर्गिक आपत्ती येऊ नये यासाठी स्वहस्ते स्थापन केलेल्या अष्टविनायकांची दिशा, निर्देशात्मक स्थान व त्यांची नावे यासंबंधीची तपशीलवार माहिती १३ व्या शतकात कर्नाटकातील हंपी येथे होऊन गेलेले विद्वान कवी राघवांक यांनी सिद्धरामाच्या चरित्रात लिहून ठेवली आहे.
राघवांक कवीने वर्णन केल्याप्रकरणी श्री गणेशाच्या सर्व आठही मूर्ती आजसुध्दा सोलापूरच्या आजूबाजूला पाहावयास मिळतात.
6) सहावा गणपती
वीरकोलाहल गणपती
भोगाव ता. उत्तर सोलापूर
वायव्य दिशेला वीरकोलाहल
अमृत हस्ते देई तो बल।
सावधान शिवसदा स्मरूनी
गति मिळवा स्वर्गलोकी म्हणुनी॥
ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर महाराजांनी स्वहस्ते स्थापन केलेला सहावा गणपती म्हणजे वीरकोलाहल गणपती होय. सोलापूरच्या वायव्य दिशेला मार्डी रस्त्यावरील बाणेगांव येथील पाटील यांच्या वीटभट्टीजवळ या गणपतीचे मंदिर आहे.
कन्नड भाषेत ‘कोला’ म्हणजे ‘देवाची पवित्र काठी’, ‘हल’ म्हणजे ‘दात’ असा अर्थ होतो. यावरुन ‘काठीसारखे कठीण दात’ असलेल्या या वीरश्रीयुक्त गणपतीला वीरकोलाहल गणपती असे नाव पडले असावे . हा गणपती आपल्या भक्कम दातांच्या सहाय्याने संकटरुपी असुरांचा नाश करुन त्याला शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करतो.
दररोज सकाळी व सायंकाळी वीरकोलाहल गणपतीची पूजा व आरती केली जाते. मंदिराचे पुजारी म्हणून शिवानंद स्वामी हे काम पाहात आहेत. दर चतुर्थीला पंचक्रोशीतील भक्त चालत ‘श्री’च्या दर्शनाला येतात.मार्डी येथील यमाई देवीच्या दर्शनाला येणारे भाविक प्रथम वीरकोलाहल गणपतीचे दर्शन घेऊन मार्गस्थ होतात.
बांधकाम आणि रंगरंगोटी नवीन असल्यामुळे मंदिर आकर्षक दिसते. तसेच परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. काही वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते कै. गौरीशंकर जक्कापुरे यांनी भक्तांना घेऊन वीरकोलाहल गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. आता या मंदिराचा लवकरच कळसारोहण करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गौरव जक्कापुरे यांनी दिली.
ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या मकर संक्रांतीच्या वेळेस होणाऱ्या यात्रेचा प्रारंभ देखील या विघ्नहर्त्या वीरकोलाहल गणपतीच्या पूजनाने करण्यात येतो.