Big9news Network
१२वी परीक्षांच्या मूल्यांकनाची पद्धत सीबीएसईने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सादर केली व हे निकाल ३१ जुलै रोजी जाहीर करण्यात येतील, असे सांगितले. १०वी, ११वी आणि १२वी या तीन इयत्तांतील गुणांचा विचार करताना ३०:३०:४० टक्के अशा रितीने मूल्यांकन करून विद्यार्थ्याला गुण देण्यात येतील.
कोरोनामुळे सीबीएसई १२वीची परीक्षा यंदा रद्द करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात न्या. अजय खानविलकर व न्या. दिनेश माहेश्वरी यांचा समावेश असलेल्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सीबीएसई बारावी निकालासंदर्भातील धोरण न्यायालयापुढे स्पष्ट केल्याने विद्यार्थी व पालक यांचा जीव भांड्यात पडला आहे. कोरोना साथ असल्यामुळे विद्यार्थ्यांची आरोग्य सुरक्षा लक्षात घेऊन सीबीएसईच्या १२वीच्या परीक्षा यंदा न घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी जाहीर केला होता.
अशा पद्धतीने दिले जाणार गुण
- दहावी व अकरावीच्या गुणांचा प्रत्येकी ३० टक्के भाग व १२वीच्या गुणांचा ४० टक्के भाग याप्रमाणे ३०:३०:४० टक्के अशा पद्धतीनेच एकत्रित मूल्यांकनाद्वारे १२वीचा निकाल जाहीर केला जाईल.
- दहावी व अकरावीमध्ये सगळ्यात जास्त गुण मिळालेल्या पाच विषयांपैकी तीन विषयांचे गुण आधारभूत मानून मूल्यांकन केले जाईल.
- १२वी इयत्तेतील चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा व प्रॅक्टिकलमध्ये मिळालेले गुण या सर्वांचा एकत्रित विचार करून १२वीचा निकाल जाहीर केला जाईल.
स्थिती सुरळीत झाल्यास प्रत्यक्ष परीक्षा
- बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मिळालेल्या गुणांविषयी विद्याथ्र्यांची काही तक्रार असेल तर ती समस्या सोडविण्याची पद्धतीही तयार ठेवा, असे सर्वोच्च न्यायालयाने सीबीएसईला सांगितले.
- कोरोना साथ आटोक्यात येऊन परिस्थिती सुरळीत होईल, त्यावेळेस १२वीची प्रत्यक्ष परीक्षा घेण्यात येणार आहे. सध्याच्या मूल्यांकन पद्धतीबद्दल समाधानी नसणारे विद्यार्थी या परीक्षेला बसून अधिक उत्तम गुण मिळवू शकतात.
दहावीचा निकाल २० जुलैला
सीबीएसईचा दहावीचा निकाल २० जुलै व बारावीचा निकाल ३१ जुलै रोजी लावण्याच्या दृष्टीने पूर्ण तयारी केली आहे, असे मंडळाचे परीक्षा नियंत्रक श्याम भारद्वाज यांनी सांगितले.