अष्टविनायक | महाडचा श्री वरदविनायक

Big9news Network

वरदविनायक गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते. वरदविनायक या रूंपात हा गणपती सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण करून आशीर्वाद प्रदान करतो. पुणे-मुंबई महामार्गापासून तीन किमी दूर खोपोली जवळ आणि पुण्याहून ८० किमी दूर हे मंदिर मुंबईच्या जवळ स्थित आहे. पालीपासून दोन तासांच्या अंतरावर खोपोलीजवळ इमॅॅजिका मार्गे महामार्गावरून उत्तरेकडे सरळ आणि खोपोलीच्या आधी हे मंदिर वसलेले आहे

  • श्री क्षेत्र वरदविनायकाची कथा :

आख्यायिकेनुसार कौन्डीन्यपूरचा सम्राट भीम आणि त्याची राणी यांना मूल नव्हते. ऋषी विश्वामित्र हे जंगलात तपस्या करीत होते. त्यांना भेटायला ते दोघे गेले. तेव्हा विश्वामित्र यांनी त्यांना एकाक्षर गणेश मंत्र त्यांना दिला. त्या मंत्राच्या जपामुळे त्यांना रुक्मंद नावाचा सुपुत्र झाला. राजकुमार रुक्मंद लवकरच लहानाचा मोठा झाला.

राजकुमार एकदा शिकारीला जंगलात गेला असता ऋषी वाचक्नवी यांच्या आश्रमात राहिला. तेव्हा ऋषींची पत्नी मुकुंदा राजकुमार रुकंद याच्या प्रेमात पडली. पण राजकुमाराने तिचे प्रेम स्वीकारण्यास नकार दिला आणि तो आश्रम सोडून निघून गेला. मुकुंदा राजकुमारासाठी झुरत असलेली पाहून इंद्राने रुक्मंद याचा वेश धारण केला आणि तो मुकुंदाकडे गेला. त्यातून मुकुंदाला दिवस गेले आणि तिने ग्रीत्सम्द नावाच्या मुलाला जन्म दिला. ग्रीत्सम्द याला जेंव्हा आपल्या जन्माविषयी समजले तेंव्हा तो आपल्या आईला शाप देतो आणि पुष्पक अरण्यात जाऊन तपस्या करू लागतो. त्याच्या तपाने गणपती प्रसन्न होतो आणि त्याला सांगतो की त्याला एक अतिशय धाडसी मुलगा होईल ज्याला केवळ भगवान शंकर हरवू शकतील.

ग्रीत्सम्द याने गणपतीला तेथेच कायमचा निवास करण्यास सांगितले आणि ब्रम्हज्ञान देण्याची विनंती केली. आज त्या जंगलाला भद्रका असे म्हणतात. ग्रीत्सम्द याने त्या जागी गणपतीचे मंदिर बांधले आणि तिथे स्थापना केलेल्या गणपतीला वरदविनायक म्हणतात. असे मानले जाते की माघी चतुर्थीला जर इथे प्रसाद म्हणून मिळालेला नारळ खाल्ल्याने पुत्र प्राप्ती होते. त्यामुळे माघी उत्सवात या अष्टविनायकाच्या देवळात भक्त अतिशय गर्दी करतात.

  • श्री वरदविनायक मंदिर आणि परिसर  : 

असे म्हणतात की गणेश येथे वरदविनायक (समृध्दी व यश देणारा ) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली. ही देवळाच्या गाभाऱ्याच्या बाहेर आहे. मूर्तीची अवस्था एकदम वाईट होती, म्हणूनच देवळाच्या ट्रस्टींनी तिचे विसर्जन केले आणि त्याजागी नवीन मूर्तीची स्थापना केली. काही लोकांनी यावर हरकत घेतली आणि कोर्टात केस दाखल केली. म्हणून आता इथे आपल्याला दोन मुर्त्या दिसतात, एक गाभाऱ्याच्या बाहेर आणि एक गाभाऱ्याच्या आंत. एक मूर्ती आहे जी शेंदुराने माखलेली असून तिची सोंड डावीकडे आहे आणि दुसरी आहे ती शुभ्र संगमरवरी असून तिची सोंड उजवीकडे आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर सर्वप्रथम रिद्धी आणि सिद्धी यांच्या मुर्त्या दिसतात आणि मग गणपतीच्या दोन मुर्त्या. या मुर्त्या पूर्वाभिमुख आहेत. या देवळात एक नंदादीप अखंड तेवत आहे.

१७७५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही वसवले. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो. असे ही म्हणतात की हा नंदादीप १८९२ पासून अखंड जळतो आहे. मंदिराच्या चारी बाजूला ४ हत्तींचे पुतळे आहेत. मंदिराचा हॉल ८० फुट लांब आणि ८० फुट रुंद असून शिखराची उंची २५ फुट असून ते सोनेरी आहे. शिखरावर नागाची नक्षी आहे.

हे एकच असे मंदिर आहे जिथे भक्त मूर्तीच्या जवळ जाऊन स्वतः नैवेद्य दाखवू शकतात.

  • श्री वरदविनायक पूजा आणि उत्सव :

हा गणपती नवसाला पावणारा आहे असे मानतात. इथे येणारे भाविक दुपारी १२ पर्यंत स्वहस्ते गणपतीची पूजा करू शकतात. दुपारी १२ ते २ या वेळात प्रसाद वाटला जातो.

गणेश चतुर्थी आणि माघ प्रतिपदा ते पंचमी (गणेश जयंती) या दिवसात उत्सव साजरा केला जातो. गणेश जयंतीच्या उत्सवात पुत्रप्राप्तीसाठी प्रार्थना करणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी होते. शिवाय अंगारकी आणि संकष्टी चतुर्थी यादिवशी विशेष पूजा केल्या जाते.

  • जाण्याचा मार्ग :

पुणे-मुंबई महामार्गावर खोपोलीजवळ हा गणपती आहे.
पुण्यापासून अंदाजे ८० किलोमीटरवर हे देऊळ आहे.
मंदिराच्या आजूबाजूस निसर्गसौदर्य असल्यामुळे आपण कोणत्याही हंगामात या ठिकाणी जाऊ शकतो.

  • जवळची इतर दर्शनीय स्थळे :

बोरघाटाच्या पायथ्याला खोपोली येथे योगीराज गगनगिरी महाराजांचा आश्रम. अंतर अंदाजे १११ किमी

खंडाळा व लोणावळा ही थंड हवेची ठिकाणे. अंतर अंदाजे १२६ किमी

कार्ले येथील कोरीव लेणी व एकवीरा मातेचे मंदिर. अंतर अंदाजे १०९ किमी

संत तुकाराम यांचे वास्तव्य असलेले देहू हे स्थळ. अंतर अंदाजे १४७ किमी

||गणपती बाप्पा मोरया||

All Rights Reserved
© ✍ लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.
संग्रहित दिनांक : २२ सप्टेंबर २०१५

॥ ॐ नम: शिवाय, ॐ नमो नारायण ॥
॥ जय श्रीराम, जय श्रीकृष्ण….॥