Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

Big9news Network

अष्टविनायकातला हा एकच असा गणपती आहे की जो भक्ताच्या नावाने (बल्लाळ) प्रसिद्ध आहे.
पाली येथील हे मंदिर बल्लाळेश्वर या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध असलेले एकमेव मंदिर आहे. हे मंदिर मुंबई-पुणे महामार्गे मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणे येथून ११ किमी अंतरावर पाली येथे आहे. हे मंदिर कोकणातील रायगड जिल्ह्यात असून ते पुण्याहून चांदणी चौक-पाषाण-बालेवाडी-महामार्गे दोन तासांच्या अंतरावर आहे. महामार्गावरील खोपोली टोल नाक्याहून यु टर्न घेऊन डावीकडे वळावे आणि लगेच उजवीकडे आणि पुलाच्या दक्षिणेला इमँजिका मार्गे सुधागढजवळ पाली स्थित आहे.

  • श्री क्षेत्र बल्लाळेश्वराची कथा :

आख्यायिकेनुसार ही त्रेता युगातील कथा आहे. पाली या गावी कल्याण नावाचा एक वाणी त्याची पत्नी इंदुमती बरोबर राहत होता. त्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा होता. बल्लाळ हा मोठा गणेशभक्त होता. तो त्याच्या मित्रांसोबत गणपतीची पूजा करीत असे. एके दिवशी या मुलांना गावाच्या बाहेर एक भला मोठा धोंडा आढळून आला. बल्लाळाच्या आग्रहामुळे मुळे त्या धोंड्याला गणपती मानून त्याची पूजा करू लागले. ती मुले गणेशभक्तीमध्ये इतकी गुंग होऊन जायची की त्यांना तहान-भूक, दिवस-रात्र कशाचेही भान उरत नसे.

सर्व मुलांचे पालक त्यांच्या परतण्याची वाट बघत होते. जेव्हा मुले परत आली नाहीत तेव्हा सर्व पालक बल्लाळचे वडील कल्याण याच्याकडे गेले आणि त्यांनी बल्लाळाची तक्रार केली. त्यामुळे कल्याण क्रोधीत झाला आणि हातात काठी घेऊन मुलांना शोधायला निघाला. त्याला मुले गणेश पुराण ऐकत असलेली सापडली आणि त्याला त्याचा क्रोध अनावर झाला. संतापाच्या भरात त्याने काठी घेऊन मुलांनी बांधलेले ते छोटेसे देऊळ तोडून टाकले. त्याने बल्लाळाला रक्तबंबाळ होईपर्यंत बदडून काढले. त्याने बल्लाळाला एका झाडाला बांधून ठेवले आणि पूजेचे सर्व साहित्य त्याने फेकून दिले. ज्याला मुले गणपती म्हणत होती, ज्याची पूजा करीत होती त्या भल्या मोठ्या धोंड्यालासुद्धा त्याने फेकून दिले. कल्याण म्हणाला, “आता बघू या कोणता देव तुझे संरक्षण करतो ते.” असे म्हणून तो घरी निघून गेला.

जरी बल्लाळाला शारीरिक जखमा, तहान आणि भूक याचा त्रास होत होता तरी त्याने त्याची शुद्ध हरपेपर्यंत गणेशजप चालूच ठेवला. त्याची अशी भक्ती बघून गणपती द्रवला आणि तो ब्राम्हणाचा वेश घेऊन बल्लाळाकडे आला. त्याने बल्लाळाला स्पर्श केला. बल्लाळाची तहान आणि भूक नाहीशी झाली, त्याच्या जखमा भरून आल्या. बल्लाळाने ब्राम्हणाच्या वेशात आलेल्या गणपतीला ओळखले आणि त्याने देवाच्या पायावर लोटांगण घातले. तेव्हा गणपतीने त्याला एक वर मागण्यास सांगितले. बल्लाळाने गणपतीला तिथेच राहण्याची विनंती करत लोकांची दुःखे दूर करण्यास सांगितले. गणपती म्हणाला, “माझा एक अंश इथेच राहील, माझ्या नावाआधी तुझे नाव घेतल्या जाईल. इथे मला लोक बल्लाळ विनायक यानावाने बोलावतील.” गणपतीने बल्लाळाला आलिंगन दिले आणि तो जवळच्या धोंड्यात लुप्त झाला. त्या धोंड्याला पडलेल्या भेगा नाहीश्या झाल्या आणि तो पुन्हा अखंड झाला. त्या दगडाच्या मूर्तीला आपण बल्लाळेश्वर या नावाने ओळखतो. कल्याण वाण्याने जो दगड फेकून दिला होता त्यालासुद्धा धुंडीविनायक असे संबोधिले जाते. ही एक स्वयंभू मूर्ती असून त्याची पूजा बल्लाळेश्वराच्या पूजेआधी केल्या जाते.

  • श्री बल्लाळेश्वर मंदिर आणि परिसर : :

एका दगडी सिंहासनावर बल्लाळेश्वराची मूर्ती स्थित आहे. ही मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे. मूर्तीची पार्श्वभूमी चंदेरी असून त्यावर रिद्धी आणि सिद्धी चामरे धरलेले दिसून येतात. मूर्तीचे डोळे आणि बेंबी हिरेजडीत आहे. ही बल्लाळेश्वराची मूर्ती तीन फुट उंच आहे.

हे मंदिर अशाप्रकारे उभारण्यात आले आहे की हिवाळ्यात दक्षिणायनात सुर्याद्याच्या वेळी सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात. मंदिर हे संपूर्णपणे दगडी असून या दगडांना शिश्याच्या रसाने एकमेकांबरोबर चिटकवलेले आहे.

साधारणतः गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो परंतु बल्लाळेश्वराच्या मंदिराची ही खासियत आहे की इथे गणपतीला बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवला जातो.

या मंदिराच्या मागे असलेल्या डोंगराच्या आकाराप्रमाणेच ही गणपतीची मूर्ती आहे. जेव्हा या डोंगराच्या फोटोला बघून गणपतीची मूर्ती पाहिल्यावर हे साम्य विशेष करून जाणवते.

  • श्री बल्लाळेश्वर पूजा आणि उत्सव : :

मंदिर सकाळी ८ पर्यंत भाविकांसाठी खुले असते. म्हणजे भाविक गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू शकतात. नंतर मात्र भाविक गाभाऱ्यात प्रवेश करू शकत नाहीत. गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात. गणेश जयंतीचा उत्सव माघ प्रतिपदा ते माघ पंचमी साजरा होतो. चतुर्थीला महानैवेद्य तर पंचमीला दहीकाला याचा नैवेद्य असतो. भाविक असे मानतात की गणपती स्वतः येऊन त्या नैवेद्याला ग्रहण करतो आणि स्वतःच्या बोटांचे ठसे नैवेद्यावर सोडतो. पाचही दिवस गणपतीची पालखी निघते. तसेच भजन-कीर्तन असा भरगच्च कार्यक्रमसुद्धा असतो.याशिवाय अंगारकी आणि संकष्टीसुद्धा साजरी केल्या जाते.

  • जाण्याचा मार्ग :

हे देऊळ पाली या गावी असून पुण्यापासून ११० किलोमीटरवर आहे. पुणे- लोणावळा -खोपोली मार्गे आपण बल्लाळेश्र्वरला जाऊ शकतो.

  • जवळची इतर दर्शनीय स्थळे : :

मंदिराच्या जवळच सरसगड नावाचा किल्ला आहे. अंतर अंदाजे २.३ किमी

सुधागड या किल्ल्यात भृगु ऋषींनी स्थापन केलेले भोराईदेवीचे देऊळ आहे. अंतर अंदाजे ११ किमी

पालीपासून तीन किमी अंतरावर सिद्धेश्वर येथील शंकराचे स्वयंभू मंदिर.

पालीपासून चार किमी वर उध्दर हे स्थान जिथे रामाने जटायूचा उद्धार केला

पालीपासून तीन किमी अंतरावर गरम पाण्याचे झरे असलेले उन्हेरे हे स्थान

पुई येथे एकवीस गणेश मंदिरे आहेत. अंतर अंदाजे २३ किमी

ठाणाळे येथे कोरीव लेणी आहेत. अंतर अंदाजे १३ किमी

||गणपती बाप्पा मोरया||

All Rights Reserved
© ✍ लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.
संग्रहित दिनांक : २१ सप्टेंबर २०१५

॥ ॐ नम: शिवाय, ॐ नमो नारायण ॥
॥ जय श्रीराम, जय श्रीकृष्ण….॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *