श्री सिद्धरामेश्वर स्थापित अष्टविनायक
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर महाराजांनी सोलापूरमध्ये (सोन्नलगी) शहरावर कोणतिही नैसर्गिक आपत्ती येऊ नये यासाठी स्वहस्ते स्थापन केलेल्या अष्टविनायकांची दिशा, निर्देशात्मक स्थान व त्यांची नावे यासंबंधीची तपशीलवार माहिती १३ व्या शतकात कर्नाटकातील हंपी येथे होऊन गेलेले विद्वान कवी राघवांक यांनी सिद्धरामाच्या चरित्रात लिहून ठेवली आहे.
राघवांक कवीने वर्णन केल्याप्रकरणी श्री गणेशाच्या सर्व आठही मूर्ती आजसुध्दा सोलापूरच्या आजूबाजूला पाहावयास मिळतात.
8) आठवा गणपती
कामेश्वर अतिथी गणपती
शिवानुभव मंगल कार्यालय, मीठ गल्ली, सोलापूर
शेळगी गजानन फारच मोठा
इथुनि जावया तयार नव्हता।
अहंकार त्याचा गळुनि गेला
छोटा होऊनि इथेच रमला ।।
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी स्वहस्ते स्थापन केलेला आठवा गणपती म्हणजे कामेश्वर अतिथी गणपती होय. सिध्दरामेश्वरांनी स्थापन केलेल्या गणपतींमध्ये या मंदिराला खुप महत्व आहे.
सोलापूरच्या आग्नेय दिशेला असलेल्या मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालयातील एका छोटेखानी मंदिरात हा शेळगीचा गणपती विराजमान झालेला आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वरांची किर्ती ऐकून त्याकाळी शेजारच्या शेळगी ग्रामातील हा गणपती सिद्धरामांच्या पवित्र सानिध्यात राहावयास मिळावे ही इच्छा मनात धरून सोन्नलगीमध्ये आला व त्याने सिध्दरामास आश्रय देण्याची विनंती केली, अशी पुराणकथा या गणपतीबाबत प्रसिध्द आहे.
तेव्हा सिध्दरामेश्वरांनी त्याच्या इच्छेप्रमाणे, परंतु सोन्नलगीच्या उत्तर वेशीचे रक्षण करण्यासाठी उत्तर वेशीच्या बाहेरच राहा, अशी आज्ञा केली. ही उत्तर दिशा म्हणजे आजची तुळजापूर वेस. येथे वेशीबाहेर त्याला जागा नेमून दिली. पुढे काही शतकानंतर येथे वेशीबाहेर या गणपतीची पूजा अर्चा व्यवस्थित होत नसल्याचे दिसून आल्याने सोन्नलगीच्या गणेशभक्तांनी त्याला गावात आणून हल्लीच्या शिवानुभव मंगल कार्यालयात त्याची स्थापना केली.
श्री माधवराव पेशव्यांनी सोलापुरात माधव पेठ स्थापन केली. त्याकाळची ही घटना असावी, असे जुन्या जाणत्या लोकांकडून सांगण्यात येते. याठिकाणी दररोज भाविकांची गर्दी असते. गणेशोत्सवात श्री सिध्दरामेश्वरांनी स्थापन केलेल्या या गणपतीची आराधना करण्यासाठी गणेश भक्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेतात.
वर्षभर दररोजच त्याचबरोबर गणेश चतुर्थी, गणेश जयंती, अनंत चतुदर्शी, श्रावण चतुर्थी, अंगारकी या दिवशी ‘श्रीं’ची स्वर्णअलंकार पूजा केली जाते. दर महिन्याच्या संकष्टीला भाविकांची मोठी रांग असते. गणेश जयंती व संकष्ट चतुर्थीला येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.
सध्या कामेश्वर गणपतीचे भक्त आणि सामाजिक कार्यकर्ते शिवानंद सावळगी हे कामेश्वर गणपती भक्त मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी पार पाडत आहेत.
ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या मकर संक्रांतीच्या वेळेस होणाऱ्या यात्रेचा प्रारंभ देखील या विघ्नहर्त्या मश्रुम गणपतीच्या पूजनाने करण्यात येतो.