Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

हे मंदिर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा यागावापासून ४८ किमी अंतरावर पुणे-सोलापूर महामार्गावर स्थित आहे. हे मंदिर भीमा नदीच्या काठावर आहे. मोरगांवहून दोन तासांच्या अंतरावर सिद्धटेक येथे हे मंदिर असून तेथे पोचण्यासाठी चौफुला-पाटस मार्गे प्रवास करावा लागतो.

  • श्री क्षेत्र सिद्धेश्वराची / सिद्धिविनायक कथा : 

आख्यायिकेनुसार जेव्हा ब्रम्हदेवाला सृष्टी निर्माण करायची होती तेव्हा त्याने “ॐ” काराचा अखंड जप केला. त्याच्या या तपस्येने गणपती प्रसन्न झाला आणि त्याने ब्रम्हदेवाला सृष्टी निर्मिती करण्याच्या त्याच्या इच्छेला पुर्णत्वास जाण्याचा वर दिला. आणि गणपतीने ब्रम्हदेवाच्या दोन कन्यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. जेंव्हा ब्रम्हदेव सृष्टी निर्माण करीत होता तेंव्हा भगवान विष्णू हे निद्राधीन झाले. विष्णूच्या कानातून मधु आणि कैतभ हे दैत्य निर्माण झाले. ते देवी-देवतांना छळू लागले. ब्रम्हदेवाच्या लक्षात आले की केवळ विष्णूच या दैत्यांना मारू शकतो, विष्णूने प्रयत्न केले पण तो त्यांना मारू शकला नाही.

विष्णूने प्रयत्नांची शिकस्त केली परंतु तो त्या दैत्यांना मारू शकला नाही. तेव्हा त्याने युद्ध थांबवले आणि गंधर्वाचे रूप धारण करून गायन सुरु केले. शंकराने त्याचे गायन ऐकले आणि त्याला बोलावले, तेव्हा विष्णूने शंकराला दैत्यांबरोबरच्या युद्धाविषयी सांगितले. मग शंकराने त्याला “ॐ गणेशाय नमः” या मंत्राचा जप करावयास सांगितला. हा जप करण्यासाठी विष्णूने सिद्धटेक या ठिकाणाची निवड केली. या डोंगरावर विष्णूने चार दरवाजे असलेले मंदिर उभे केले आणि त्यात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. गणेशाची आराधना केल्यावर विष्णूला सिद्धी प्राप्त झाली आणि त्याने मधु आणि कैतभ या दैत्यांचा संहार केला. कालांतराने विष्णूने उभारलेले मंदिर नष्ट पावले.

दुसऱ्या आख्यायिकेनुसार एका गुराख्याने येथे गणपतीला पाहिले आणि तो गणपतीला पुजू लागला. नंतर इथे पूजा-अर्चा करण्यासाठी त्याला एक पुरोहित मिळाला. अखेरीस पेशव्यांच्या राज्यात इथे पुन्हा मंदिर उभारले गेले. छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. १५ फूट उंचीचे व १० फूट लांबीचे हे देऊळ पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधले. ३ फूट उंच व २.५ फूट लांबीची ही मूर्ती स्वयंभू आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे ५ किलोमीटर फिरावे लागते. हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यांतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी परत मिळाल्याची अख्यायिका सांगितली जाते. या मंदिराच्या जवळून भीमा नदी वाहते.

  • श्री सिद्धेश्वर/सिद्धिविनायक मंदिर आणि परिसर : 

सिद्धिविनायक देवळातील मूर्ती ही स्वयंभू असून ती तीन फुट उंच आहे. ही मूर्ती उत्तराभिमुख असून या गणपतीची सोंड ही उजवीकडे आहे. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे की त्याची सोंड उजव्या बाजूस आहे. ही गणपतीची स्वयंभू मूर्ती एका पितळेच्या चौकटीत स्थित आहे. गणपतीचे पोट जास्त मोठे नसून मांडीवर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गणपतीच्या दोन्ही बाजूला जय-विजय यांच्या पितळेच्या मुर्त्या स्थित आहेत. गणपतीची मुद्रा अतिशय शांत आहे. असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाच्या पाच प्रदक्षिणा करणे हे अतिशय फलदायक आहे. एक प्रदक्षिणा म्हणजे ५ किमीचा प्रवास कारण ही मूर्ती डोंगराला जोडलेली आहे. एका प्रदक्षिणेला जवळजवळ अर्धा तास लागतो.

  • श्री सिद्धेश्वर/सिद्धिविनायक पूजा आणि उत्सव : 

सिद्धिविनायक मंदिराचे द्वार सकाळी ४ वाजता उघडले जाते. ४.३० ते ५ श्रींचे पूजन होते. सकाळी १० वाजता देवाला खिचडीचा नैवेद्य दाखविला जातो. ११ वाजता पंचामृती पूजा होते. दुपारी १२.३० वाजता महानैवेद्य दाखविला जातो. सूर्यास्तानंतर तिसरी पूजा केली जाते. रात्री ८.३० ते ९.१५ यावेळात आरती केली जाते. त्यानंतर मंदिर भक्तांसाठी बंद होते.

या मंदिरात गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती हे उत्सव साजरे केले जातात. या सणांना सलग तीन दिवस गणपतीची पालखी निघते. सोमवती अमावस्यासुद्धा साजरी केली जाते. विजयादशमीला येथे जत्रा भरते.

पुणे आणि सर्व अष्टविनायक मंदिरे यादरम्यान राज्य परिवहन मंडळाच्या विशेष बस जातात. खासगी टूर कंपन्यासुद्धा या टूर्स आयोजित करतात. भक्तांना राहण्यासाठी सर्व मंदिरांच्या ठिकाणी धर्मशाळा, हॉटेल आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे रिसोर्ट उपलब्ध आहेत.

  • जाण्याचा मार्ग :

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सिध्दटेक येथे हे मंदिर आहे. पुण्यापासून अंदाजे ९९ किलोमीटरवर देऊळ आहे.

  • जवळची इतर दर्शनीय स्थळे:

पेडगांव येथील भीमा नदीच्या तीरावरील प्राचीन मंदिरे आणि किल्ला. अंतर अंदाजे ९ किमी

राशीन येथील झुलती दीपमाळ आणि देवीचे मंदिर. अंतर अंदाजे २१ किमी

रेहेकुरी येथील अभयारण्य. अंतर अंदाजे ३१ किमी

भिगवण येथील पक्षी अभयारण्य. अंतर अंदाजे २७ किमी

दौंड येथील भैरवनाथ आणि श्री विठ्ठल मंदिर. अंतर अंदाजे २६ किमी.

||गणपती बाप्पा मोरया||

All Rights Reserved
© ✍ लेखन / माहिती संकलन : रमेश साहेबराव जाधव.
संग्रहित दिनांक : २० सप्टेंबर २०१५

॥ ॐ नम: शिवाय, ॐ नमो नारायण ॥
॥ जय श्रीराम, जय श्रीकृष्ण….॥

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *