श्री सिद्धरामेश्वर स्थापित अष्टविनायक
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर महाराजांनी सोलापूरमध्ये (सोन्नलगी) शहरावर कोणतिही नैसर्गिक आपत्ती येऊ नये यासाठी स्वहस्ते स्थापन केलेल्या अष्टविनायकांची दिशा, निर्देशात्मक स्थान व त्यांची नावे यासंबंधीची तपशीलवार माहिती १३ व्या शतकात कर्नाटकातील हंपी येथे होऊन गेलेले विद्वान कवी राघवांक यांनी सिद्धरामाच्या चरित्रात लिहून ठेवली आहे.
राघवांक कवीने वर्णन केल्याप्रकरणी श्री गणेशाच्या सर्व आठही मूर्ती आजसुध्दा सोलापूरच्या आजूबाजूला पाहावयास मिळतात. श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या या अष्टविनायकांची माहिती आम्ही आमच्या वाचकांसाठी देत आहोत.
2) दुसरा गणपती
*बेनक गणपती,*
होटगी.
बेनक गणपती आग्नेय दिशेचा
मार्ग दावी तो कैवल्यपदाचा ।
प्रकाश पाहुनी अंतरात्म्याचा
ध्यान करा म्हणे परमात्म्याचा ।।
श्री सिध्दरामेश्वर महाराजांनी स्वहस्ते स्थापन केलेला दुसरा गणपती म्हणजे बेनक गणपती होय. सोलापूरच्या आग्नेय दिशेला जुन्या कुंभारी-होटगी रोडवरील होटगी शिवारात एका शेताच्या बांधावर बेनक गणपतीचे मंदिर आहे.
‘बेनक’ हा कानडी शब्द असून याचा मराठीमध्ये अर्थ ‘पाठीराखा’ असा होता. या गणपतीचे दर्शन घेतल्यास तो भक्तांचा पाठीराखा बनून सर्व दुःखे दूर करतो, अशी श्रध्दा आहे.
या गणपतीचे मंदिर हे जुन्या पध्दतीचे, अत्यंत लहान व दरवाजा खिडकीच्या झरोक्याएवढे अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे भक्तांना बेनक गणपतीचे दर्शन हे चक्क जमिनीवर लोटांगण घालूनच घ्यावे लागते.
मंदिरातील आतल्या छोट्याशा गाभाऱ्यात आणखी काही देव-देवतांच्या गुळगुळीत झालेल्या लहान लहान चार ते पाच मूर्ती आहेत. या मूर्ती कोणाच्या आहेत, याबाबत निश्चित माहिती मिळत नाही.
जुन्या रस्त्याकडील मंदिराच्या भिंतीवर कन्नड मजकूर देवनागरी भाषेत लिहिलेला दिसतो. तसेच मंदिर परिसरात श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांची माहिती देणारा फलक लावण्यात आला आहे.
ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या मकर संक्रांतीच्या वेळेस होणाऱ्या यात्रेचा प्रारंभ देखील या विघ्नहर्त्या बेनक गणपतीच्या पूजनाने करण्यात येतो.
मंदिरांचा परिसर अतिशय शांत व निसर्गरम्य आहे. मात्र या मंदिराचा जीर्णोद्धार होणे गरजेचे असल्याची भावना गणेशभक्त बोलून दाखवितात. त्याचबरोबर होटगी ते कुंभारी या रस्त्याचे देखील डांबरीकरण होणे आवश्यक आहे.