श्री सिद्धरामेश्वर स्थापित अष्टविनायक
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर महाराजांनी सोलापूरमध्ये (सोन्नलगी) शहरावर कोणतिही नैसर्गिक आपत्ती येऊ नये यासाठी स्वहस्ते स्थापन केलेल्या अष्टविनायकांची दिशा, निर्देशात्मक स्थान व त्यांची नावे यासंबंधीची तपशीलवार माहिती १३ व्या शतकात कर्नाटकातील हंपी येथे होऊन गेलेले विद्वान कवी राघवांक यांनी सिद्धरामाच्या चरित्रात लिहून ठेवली आहे.
राघवांक कवीने वर्णन केल्याप्रकरणी श्री गणेशाच्या सर्व आठही मूर्ती आजसुध्दा सोलापूरच्या आजूबाजूला पाहावयास मिळतात.
3) तिसरा गणपती
धुळी महांकाळ गणपती
रेवणसिध्देश्वर मंदिर
महांकाळ नामे वक्रतुंड पाही
दक्षिणेस रेवणसिद्ध मंदिरी ।
पंचभुतांचा देह विसरूनी
समरस होण्यासांगे इष्टलिंगी ॥
ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्वर महाराजांनी स्वहस्ते स्थापन केलेला तिसरा गणपती हा धुळी महांकाळ गणपती होय. सोलापूर शहराच्या दक्षिणेला कंबर तलावाच्या शेजारी असलेल्या पुरातन श्री रेवणसिध्देश्वर मंदिराच्या प्रांगणात धुळी महांकाळ गणपती आहे.
या गणपतीचे नाव श्री नंदी (धुळी) महांकाळ गणपती असे आहे. सिध्दरामेश्वरांचे मूळचे नाव लोकांच्या विस्मृतीत जाऊ नये यासाठी त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या गणपतीचे नाव धुळी महांकाळ असे ठेवले असावे.
श्री रेवणसिध्देश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या काही जाणकारांच्या मते महिला आपल्या चिमुकल्या बाळास या गणपतीच्या चरणांवर वाहतात, यामुळे बाळाचे आयुष्य वाढते, अशी त्यांची श्रध्दा आहे. यामुळे गणेश भक्तांनी याठिकाणी छोटेखानी मंदिर बांधलेले आहे.
ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या मकर संक्रांतीच्या वेळेस होणाऱ्या यात्रेचा प्रारंभ देखील या विघ्नहर्त्या बेनक गणपतीच्या पूजनाने करण्यात येतो.