सोलापूर | भुसार व्यापार आठ दिवस ठेवणार बंद ; हे आहे कारण

Big 9 News Network

सोलापूर,दि.१९ : बुधवार (दि.१९) रोजी भुसार आडत व्यापारी संघाची ऑनलाईन बैठक झाली. बैठक झाल्यानंतर व्यापारी आडत संघातर्फे सर्व सभासद व व्यापाऱ्यांना सोमवार पासून व्यवहार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बुधवारी(दि.१९) रोजी झालेल्या भुसार आडत व्यापारी संघाच्या कार्यकारणी मंडळाची ऑनलाईन सभा संघाचे अध्यक्ष प्रभाकर विभुते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर मिटिंग मध्ये कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव व प्रशासनाकडून व्यापाऱ्यांवर वेळोवेळी होत असलेल्या कारवाई बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

त्यास अनुसरून ऑनलाईन झालेल्या मिटींगमध्ये ठरल्या प्रमाणे व्यापारी वर्ग कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात सुध्दा सेवा देत असताना, त्यांच्या जिवाला सुध्दा धोका निर्माण झाला आहे व तसेच प्रशासनाकडुनही वारंवार होत असलेल्या त्रासदायक कारवाईला व अरेरावीला कंटाळून सोमवार दिनांक २४/५/२०२१ पासुन ३१/५/२०२१ पर्यंत आपले भुसार विभाग संपुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तरी सर्व व्यापारी बंधूंनी आपल्याकडे येणाऱ्या मालाचे लोडिंग व अनलोडिंग ची व्यवस्था रविवार दिनांक २३/५/२०२१ पर्यंत करून घ्यावे. दिनांक २४/५/२०२१ पासुन दिनांक ३१/५/२०२१ पर्यंत आपले संपूर्ण व्यवहार बंद राहणार आहे याची सर्व व्यापारी बंधूंनी नोंद घ्यावी. असे आवाहन आडत व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रभाकर विभुते, उपाध्यक्ष सुरेश चिक्कळी, सेक्रेटरी मोहन कोंकाटी यांनी केले आहे.