‘स्वामीं’चा नवोपक्रम | आता…जिल्हा परिषदेची ई- सेवापुस्तक प्रणाली राज्यभर

Big9news Network

सोलापूर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषद अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करुन त्यांचे डिजिटलायझेशन केले व ॲन्ड्रॉईड मोबाईल ॲपच्या माध्यमातून सेवा पुस्तक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हातात दिले आहे. आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या ॲपच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ऑनलाईन पार पडला त्यावेळी राजेश कुमार बोलत होते. पुढे बोलताना राजेश कुमार म्हणाले सोलापूर जिल्हा परिषदेने नेहमीच राज्याला पथदर्शी ठरतील असे उपक्रम दिले आहेत. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सोलापूर जिल्हा परिषद नेहमीच अग्रेसर राहिली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात प्रथमच ई-सेवापुस्तक प्रणाली राबवून राज्याला पथदर्शी उपक्रम दिला आहे. सेवा पुस्तक अद्ययावत नसेल तर सेवानिवृत्ती वेळी अधिकारी व कर्मचारी यांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. सीईओ स्वामी यांनी नेमकी हीच अडचण ओळखून हा उपक्रम हाती घेतला व पुर्णत्वास नेला. कमी कालावधीत तब्बल 14000 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक अद्ययावत करुन स्कॅन करणे हे जीकरीचे काम पुर्ण केले. त्याबद्दल मी सीईओ स्वामी यांचे अभिनंदन करतो.

 

बार्शी पंचायत समिती येथील कर्मचारी आनंद साठे या कर्मचाऱ्याने सेवा पुस्तक स्कॅन करून पीडीएफ स्वरुपात कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर देण्याची संकल्पना मांडली होती. जिल्हा परिषदेत परत आल्यानंतर येथील अधिकारी व माहिती तंत्रज्ञान कक्ष यांच्याशी चर्चा केल्यानंतर ॲप स्वरूपात सेवा पुस्तक ऑनलाइन करण्याची संकल्पना मांडली. त्यानंतर सलग सहा महिने जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी अपार मेहनत घेऊन हे प्रचंड वाटणारे काम लिलया पार पडले. या सर्व कामकाजाचे संनियंत्रण तात्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत व सध्याच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी उत्कृष्ट रित्या केले. प्रत्येक आठवड्याला ॲप निर्मिती कामकाजाचा आढावा घेतला जात होता. या ॲपमध्ये आम्ही सेवा पुस्तकासह कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाची स्लीप तसेच मुख्यालय स्तरावरुन कामकाजा संदर्भात दिले जाणारे संदेश यांचा सुध्दा समावेश केला आहे. एका क्लीक मध्ये संदेश ग्रामपातळीवरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचेल. त्याचप्रमाणे भविष्यात ई-पेन्शनचाही अंतर्भाव यात होणार असल्याचे यावेळी सीईओ स्वामी यांनी सांगितले. या उपक्रमात मुख्यालय व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी विशेषतः शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनी अपार मेहनत घेतली. याकामी सर्व पदाधिकारी व अधिकारी यांचे चांगले सहकार्य लाभले त्यामुळे या सर्वांचे सीईओ स्वामी यांनी आभार मानले. हा उपक्रम म्हणजे टीमवर्कचे उत्तम उदाहरण असल्याचे यावेळी सीईओ स्वामी म्हणाले.

यावेळी मुंबई मंत्रालयातून अप्पर मुख्य सचिव कार्यालयातून उपसचिव प्रविण जैन, गटविकास अधिकारी दक्षिण सोलापूर राहुल देसाई त्याचप्रमाणे विभागीय आयुक्त कार्यालयातून उपायुक्त राहुल साकोरे, उपायुक्त विकास विजय मुळीक, उपायुक्त संतोष पाटील व गटविकास अधिकारी मोहोळ गणेश मोरे उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण सभागृहात सभापती अर्थ व बांधकाम विजयराज डोंगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसींह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन चंचल पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत ईशाधीन शेळकंदे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता स्मिता पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक भास्करराव बाबर, मोहीम अधिकारी बालकल्याण जावेद शेख, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम सुर्वे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

यावेळी या ॲपची निर्मिती करणारे प्रसंना स्वामी, तांत्रिक सहाय्य करणारे माहिती तंत्रज्ञान कक्षाचे श्रीधर कलशेट्टी व त्रिमूर्ती राऊत, हनुमंत गायकवाड, फंडाच्या स्लीप चे काम करणारे विलास मसलकर, बार्शी पंचायत समितीचे लिपिक आनंद साठे, साप्रवि मधील कनिष्ठ सहाय्यक नरेंद्र अकेले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक लिंगराज यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसींह पवार यांनी मानले.