विद्यापीठात इतिहास विभाग सुरू करण्यास मान्यता

Big9news Network

सोलापूरच्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात स्वतंत्र इतिहास विभाग सुरू करण्यात येणार आहे. आमदार सुभाषबापू देशमुख यांनी सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून ही मागणी केली होती आणि विविध स्तरावर तिचा पाठपुरावाही केला होता. त्या प्रयत्नाला यश आले आहे. या बद्दल विद्यापीठातल्या आणि विविध महाविद्यालयातल्या इतिहासाच्या प्राध्यापकांनी आणि इतिहासप्रेमी नागरिकांंनी आमदारांचा सत्कार केला.

सोलापुरात इतिहास विषयात पदवी घेणार्‍या विद्यार्थ्यांना विद्यापीठात या विषयाचा पदव्युत्तर अभ्यास करण्याची इच्छा असे पण तसा विभागच नव्हता. म्हणून आमदार सुभाषबापू देशमुख यांंनी अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याकडे या मागणीचे निवेदन दिले. त्याचबरोबर या मागणीचा पाठपुरावा करताना त्यांनी राज्यपालांना आणि पंतप्रधानांनाही तशी निवेदने पाठवली. त्याला यश आले आहे.

विद्यापीठाच्या अधिष्ठाता सभेत विद्यापीठाचा बृहत् आराखडा मांडताना कुलसचिव डॉ. विकास कदम व इतर संबंधित विद्यापीठ अधिकारी यांनी त्यात या विषयाचा समावेश केला. हा विषय विद्या परिषदेच्या सदस्यांंनी तो एकमताने मंजूर केला. या बद्दल प्राध्यापक आणि इतिहासप्रेमी नागरिकांतर्फे सुभाषबापूंचा सत्कार करण्यात आला. त्यांंच्या प्रयत्नातून सोलापूरकरांंना ही दिवाळीची भेटच मिळाली आहे असे मत प्रा. नामदेवराव गरड यांनी या प्रसंगी बोलताना व्यक्‍त केले.

हा इतिहास विभाग स्थापनेच्या संदर्भात विद्यापीठाची निर्मिती झाल्यापासून आतापर्यंतचा प्रवास व प्रयत्न प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर यांनी सविस्तर विशद केला.

मा. आमदार सुभाषबापूंनी या प्रसंगी बोलताना, विद्यापीठात इतिहासाच्या पदव्युत्तर अभ्यासाची सोय झाल्याबद्दल आनंद आणि सामाधान व्यक्‍त केले. शहरात एक ऐतिहासिक वस्तू संग्रहायला उभारण्यात यावे अशीही मागणी आहे. लवकरच ही मागणी मान्य होऊन सोलापूरच्या इतिहासाविषयीची आणखी एक उणीव दूर होईल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजेन्द्रसिंह लोखंडे यांनी केले तर प्रा. एम. ए. मस्के यांनी आभार मानले.

यावेळी प्राचार्य एम. ए. शेख, प्रा.डॉ. नरेन्द्र काटीकर, नितीन अणवेकर, दशरथ रसाळ, संतोष मारकवाड, इत्यादी उपस्थित होते.