Big9news Network
केएलई प्रशालेच्या प्रांगणात इतिहासप्रेमी नागरिक जमत होते. बसची वाट पाहत चहा-गप्पा झाल्या. अखेर प्रतीक्षा संपून बस आली. प्रवासाची व्यवस्था इंस्टीट्युशन ऑफ इन्जीनियर्स, इंडिया च्या सोलापूर लोकल सेंटरने केली होती. संस्थेचे अध्यक्ष प्रा शेख सर सहलीला शुभेच्छा द्यायला उपस्थित होते. इंटॅकचे आजीव सदस्य प्रा डॉ नरेंद्र काटीकर व प्रा शेख सर यांच्या हस्ते नारळ वाढवून इंटॅक आयोजित वेळापूर सहलीला प्रारंभ झाला. सहभागींचा दुसरा गट पुणे नाका येथे सामील झाला. सहभागींमध्ये शाळा कॉलेजचे विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, ज्येष्ठ नागरिक, प्रवासाची व इतिहासाची आवड असलेले आबालवृद्ध होते. पंढरपूर येथे चहा नाश्त्यासाठी थांबून पुढे वाटेत बाजीरावाची ऐतिहासिक विहीर पाहिली. मराठेकालीन जलस्थापत्याचा उत्तम नमुना असलेली, एकेकाळी पालखी मार्गावर वारकऱ्यांची तहान भागवणारी ही विहीर लवकरच महामार्गाच्या फ्लायओव्हरखाली अर्धवट झाकली जाणार आहे. त्यापूर्वीचे हे दर्शन सर्वांना सुखावणारे होते.
वेळापूरला सिद्धनाथ मंदिरापासून सुरुवात करून गावाबाहेरील काळा मारुती, खंडोबा व तांबडा मारुती यांची मंदिरे पाहिली. प्रवेशद्वारे, दीपमाळा, प्रशस्त आवारे, कोरीव विरगळ व सतीस्तंभ, खंडोबा मंदिराची सुबक वेस, नंदी मंडप व शिखर तसेच बारव पाहताना व त्याबद्दलची माहिती ऐकताना सर्वजण भारावून गेले. त्यानंतर प्राचीन उमा महेश्वराच्या मंदिराच्या भव्य प्रांगणासमोर बस थांबली. पाण्याने भरलेल्या प्राचीन कुंडात बहुसंख्येने कासवे, काठावर चाफ्याचे तसेच वड पिंपळाची झाडे यामुळे परिसर रमणीय दिसत होता. यादव राजवटीत इस ११०० ते १२५० या कालावधीत ही मंदिरे बांधली आहेत. त्याकाळी देवगिरी ते कर्नाटक या प्रवासात वेळापूर हे महत्त्वाचे ठिकाण होते.
या मंदिरातील मूर्तीला ‘अर्ध नारीनटेश्वर’ असे ओळखले जात असले तरी प्रत्यक्षात ही उमा-महेश्वर आलिंगन स्थानक मूर्ती आहे हे डॉ देगलूरकर व इतर पुरातत्त्वतज्ञांनी स्पष्ट केले आहे. तीन गाभारे असलेली रचना, सभामंडपात सप्त मातृकांचे पट, सुंदर कोरीव कामांचे मधले स्तंभ यामुळे मंदिराची प्राचीनता लक्षात येते.
यानंतर सर्वांनी मंदिराच्या आवारात सुग्रास भोजनाचा आनंद घेतला व त्यानंतर पुरातत्व संग्रहालय पाहिले. वेळापूर म्हाळुंग परिसरात सापडलेले प्रचंड मोठ्या आकाराचे असंख्य विरगळ, मूर्ती, सतीस्तंभ व शिलालेख याठिकाणी पाहायला मिळतात त्यावरून एके काळी इथे किती समृद्ध संस्कृती नांदत होती हे लक्षात येते.
सहलीचा अखेरचा टप्पा होता तळ्याकाठ्चे कंचनी मंदिर. त्यावेळी संध्याकाळची उतरती उन्हे, तळ्यात डोकावणारे आकाश, काठावरची झाडी यामुळे मंदिराचे दृश्य खूपच विलोभनीय दिसत होते. इथे ‘इंटॅक सोलापूर’ च्या वाटचालीची माहिती समन्वयक सीमंतिनी चाफळकर यांनी सांगितली, तसेच सहभागींनी आपली मते व सूचना सांगितल्या. प्रा वंदना कोपकर व कुटुंबिय, विलास माळी, ज्ञानेश्वर कांबळे, श्री उबाळे, श्री निमगिरे व कुटुंबिय, रणशुर्य व कुटुंबिय, प्रा सोनाली गिरी व विद्यार्थी, आशिष मोरे, आर्चिस ढोबळे, आशुतोष कुमठेकर, आर्कि अमोल चाफळकर व विद्यार्थिनी, वैशाली वडगावकर, सावळगी व वच्छे कुटुंबिय सहभागी झाले होते. या ठिकाणी समूहाचे छायाचित्र काढून, तसेच पंढरपूरला चहा घेऊन सहलीची सांगता झाली. वेळापूर सहलीची क्षणचित्रे एकमेकांना पाठवली जातीलच पण ती सहभागी मंडळींच्या मनात अनेक दिवस आठवण रूपाने राहतील हे नक्की.!
सदस्य प्रा नरेंद्र काटीकर, सह समन्वयक श्वेता कोठावळे व पुष्पांजली काटीकर यांनी नियोजनासाठी परिश्रम घेतले. वेळापूरच्या स्थानिक पुरातत्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले, तसेच पंढरपूरच्या लटके बंधू, बिलाल शेख, सागर सावंत व भागानगरे यांनी भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था केली. आय आय इ चे शेख सर व या सर्वांचे ‘इंटॅक सोलापूरच्या वेळापूर सहलीत मोठे योगदान होते. या सर्वांचे व सर्व सहभागींचे मनापासून आभार.!
Leave a Reply