मनपा उपायुक्त N.K.पाटील प्रकरणी आयुक्तांना ‘झटका’ ; असे आला लेटर बॉम्ब

Big9news Network

महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी उपायुक्त एन. के. पाटील यांना अकार्यक्षम ठरवून कार्यमुक्त केले होते. यावर ताशेरे ओढत नगरविकास खात्याने सोमवारी हा आदेश रद्द केला. पाटील यांना तत्काळ रुजू करून घेण्यासही कळविले.

उपायुक्त एन. के. पाटील जून २०२१ मध्ये पालिकेत रुजू झाले होते. आयुक्त पी. शिवशंकर यांनी त्यांच्याकडे भूमी मालमत्ता कर आकारणी सामान्य प्रशासन यासह विविध कामांची जबाबदारी सोपविली होती. या विभागांच्या कामात पाटील यांनी निष्काळजीपणा केला. नोटिसांना समाधानकारक खुलासा केला नाही यासह विविध कारणे देऊन आयुक्तांनी त्यांना कार्यमुक्त केले होते. पाटील यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्तावही ठेवला होता. आयुक्तांचा हा निर्णय एकतर्फी असून वैयक्तिक निर्णय घेतल्याचा आरोप एन. के. पाटील वादातून हा यांनी केला होता. पाटील यांनी याबद्दल नगरविकास खात्याकडे तक्रार केली.

महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार पाटील यांना कार्यमुक्त करण्यापूर्वी शासनाची पूर्व सहमती घेणे अथवा शासनास त्यांच्याबाबत अहवाल पाठवून त्यांची अन्यत्र पदस्थापना करण्याची विनंती करणे उचित ठरले असते. शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना एकतर्फी कार्यमुक्त करण्याचे कोणतेही अधिकार आयुक्तांना नाहीत. कोणतेही नियम नमूद न करता तुम्ही काढलेले आदेश रद्द करण्यात येत आहेत. पाटील यांना तत्काळ कामावर रुजू करून घ्यावे. अहवाल शासनास तत्काळ पाठवावा, असे नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी वि.ना.धाईजे यांनी दिले आहेत.