आदित्य…गप्पा मारायला येतोस का ?

थकलेल्या_आईबाबांचं_शहर
 जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त 
“अरे आदित्य…केवढा मोठा झालायस. सहा महिन्यांचा असताना बाबांच्या मांडीवर बघितलं होतं तुला. गाडी सावकाश चालवत जा रे. हे घे तुझ्यासाठी आणि तुझ्या मित्रांसाठी किटकॅट”

बाबांचे ७९ वर्षांचे मित्र वसंत विहारमध्ये माझ्याशी गप्पा मारत होते. थकलेलं शरीर. हातात काठी. एसबीआयमधला आपला मित्र अरुण गाडगीळचा मुलगा इकडे येणार आहे हे कळाल्यावर खूप आपुलकीने वाट बघत थांबलेले. पाचेक मिनिटं बोलून आणि प्रेमाने भरवलेलं किटकॅट खाऊन मी निघालो. ते तिथेच रस्त्यावरची गंमत बघत बसून राहिले. आयुष्याची संध्याकाळ कशी घालवावी याचा विचार करत दिवस ढकलणाऱ्या सोलापूरातील ज्येष्ठांचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण !

सोलापूरातल्या रोजगाराच्या मर्यादित संधींमुळे गेली दोन दशकं तरुण सोलापूरकरांनी महानगरांची वाट धरली. “पुण्यामध्ये सेटल झालेल्या सोलापूरकरांची संख्या” हा तर आमच्याकडचा सार्वजनिक चर्चेचा विषय. करिअर, पॅकेज, लाईफस्टाईल, फ्रीडम मिळवण्यासाठी (‘हव्यासापोटी’ हा शब्द वापरणं कदाचित अयोग्य ठरेल) गेलेल्या या तरुणांच्या मागे मोठ्या संख्येनं राहिलेत सिनियर सिटीझन झालेले त्यांचे आईबाप ! होय…सोलापूर हे ‘थकलेल्या आईबाबांचं शहर’ बनू पाहतंय.

ही परिस्थिती का आली (खरंतर ओढावली) हा माझ्या लिखाणामागचा मुद्दा नाही. त्यावर बरंच मंथन घडू शकेल. या थकलेल्या आईबाबांची मनःस्थिती काय आहे याकडे लक्ष वेधायचंय.

नुकतंच आमच्या जुन्या फ्लॅटची पाहणी करायला गेलो होतो. त्या अपार्टमेंटचं रूपांतर वृद्धाश्रमात झालेलं. बहुतांश घरात साठीच्या पुढचे दोघे-दोघेच. चेहरे ओढलेले. अगदी जगण्यातला आनंद संपलाय असं नाही. पण बहुतांश जणांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह ! “आपल्या दोघांमधलं एक जण गेल्यावर कसं ?” “कदाचित पूर्ण एकटं पडल्यावर मुलं घेऊन जातील पुण्याला. नेतील ना ?”

कोरोनाच्या आधी शुक्रवारी रात्री येणारी इंटरसिटी रेल्वे बघायला गंमत वाटायची. ‘फाईव्ह डे वीक’ जगून वीकेंडला आईबाबांना भेटायला येणारी मुलं-मुली दिसायची. “मुलगा इन्फोसिसमध्ये आहे. साडेसात लाखाचं पॅकेज आहे” किंवा “मुलीने टू बीएचके घेतला बरं का कोथरूडला” असं अभिमानानं सांगताना अनेक थकलेल्या आईबाबांचा ऊर भरून आलेलं पाहिलंय मी. कोरोनाने या वीकेंडच्या आनंदावरही घाव घातला.

नाही म्हणायला व्हिडीओ कॉलवर बोलणं होतं खरं. पण मुलांना आजकाल तेवढाही वेळ मिळेनासा झालाय. शहरात निवांत जाऊन बसता येईल अशी जागा नाही. टीव्ही सिरीयल्स किती बघायच्या ? पोथीवाचन, अध्यात्म यामध्ये सरसकट प्रत्येकाचं मन रमतंच असं नाही. आपण “कही दूर जब दिन ढल जाये..” म्हणणारा राजेश खन्ना झालोयत का असं वाटायला लागतं. आमच्या परिचितांमधील एक काका गंमतीने म्हणाले “दुपारी ४ चा चहा झाला की अर्धा दिवस संपला असं आम्ही जाहीर करतो” थोडक्यात काय तर कसाबसा ढकलायचा दिवस ! मानवी जीवनाची काय कमाल आहे ना ! बालपण किती काळ असेल हे प्रत्येकाला माहिती असतं. पण आयुष्यात वार्धक्य किती वर्षे असेल हे कोण सांगू शकेल ?

बहुतांश जणांचे मुलांच्या वाटेकडे डोळे लागून राहिले आहेत. एक काकू म्हणाल्या “ऍट लिस्ट फिक्स डिपॉझिटं किती ठेवली आहेत हे जाणून घेण्यासाठी तरी मुलांनी यावं अशी इच्छा आहे. प्रॉपर्टीची वाटणीसुद्धा लवकर झालेली बरी. आमच्यामागनं मुलांमध्ये भांडणं नकोत”

दुसरीकडे “मुलांना आम्ही नकोसे झालो आहोत. मग आम्ही तरी स्वकष्टार्जित त्यांना का द्यावं ? त्यापेक्षा दान करून टाकू” अशाही काही तिखट प्रतिक्रिया माझ्या कानावर पडल्या आहेत.

आईबाबा दोघेही बँकेत असल्यानं बँकिंग इंडस्ट्री मी जवळून बघितली आहे. तरुण मुलांचा आधार घेत पेन्शन काढण्यासाठी आलेले थरथरते हात बघितले आहेत. आईबापाचा जीव मुलात अडकलेला आणि मुलांचा मात्र त्यांच्या पेन्शनमध्ये ! पेन्शन घेऊन ब्रँचच्या बाहेरच सोडून पसार होणारे काही तरुण तुर्क. घरी नेऊन सोडण्याचीही तसदी बरेचजण घेत नाहीत. पेन्शनर आईबाप म्हणजे जणू एकप्रकारचं ‘एटीएम’ कार्डच.

गंमत म्हणजे, आपली उतारवयातली जबाबदारी पार पाडण्यासाठी आपली मुलं बांधील नाहीत, असं मानणारेही अनेक ज्येष्ठ नागरिकही मला भेटले आहेत. “त्यांचं-त्यांचं नीट चाललंय ना. मग बास. आमचं काही का होईना” असंही काहीजण हसत हसत सांगतात. ‘वास्तव’मध्ये रिकामटेकडा असताना एका कॉटवर पडून राहणारा मोठा मुलगा (मोहनिश बहल) नोकरी मिळाल्यावर आईबापापासून वेगळं होण्याचं जाहीर करतो. भडकलेल्या नवऱ्याला (शिवाजी साटम) शांत करताना आई झालेली रिमा लागू म्हणते “चिडीया के बच्चे जब बडे हो जाते हैं तो लौटकर वापस नही आते. हमारे बच्चोंको भी यह अधिकार हैं !”

सगळेच थकलेले आईबाबा नाराज आहेत असं बिलकुल नाही. आपल्यासोबत राहणं नको असण्याचा मुलांचा हा अधिकार अनेक आईबाबांनी आनंदानेही मान्य केलाय.

थकलेल्या आईबाबांमध्ये दोन्ही प्रवृत्ती आहेत. आनंद आणि दुःख आहे, थकवा आणि उत्साह आहे, दिवस ढकलणं आणि जबाबदाऱ्या संपल्यामुळे एन्जॉय करणं सुद्धा आहे. ‘वृद्धाश्रमात आपला निभाव लागेल का’ असा खिन्न प्रश्न सुद्धा ऐकायला मिळतोय आणि ‘राहतं घरच वृद्धाश्रम झालंय की’ अशी मिश्कील कॉमेंटही कानावर पडतेय. एवढंच नव्हे, ज्यांची मुलं जवळ राहिलीयेत त्यांच्याबद्दल क्वचितच मत्सरसुद्धा आहे !

आमचे स्नेही Milind Gorte यांनी “आईबाबा आमच्याकडे राहत नाहीत. आम्हीच त्यांच्याकडे राहतो” अशी भन्नाट पोस्ट टाकली होती. सुसंस्कारित मध्यमवर्गीयांच्या मागच्या पिढीमध्ये कुटुंबाची व्याख्या काय होती याचं आदर्श उदाहरण म्हणून याकडे बघता येईल.

आणखी एका फेसबुक स्नेहीने मध्यंतरी “कोणाकोणाला आपल्या आईबापाला-सासूसासऱ्यांना वृद्धाश्रमात पाठवायला आवडेल ?” असा प्रश्न विचारून समाजमनाचा कानोसा घेतला होता. त्यावर आलेल्या कमेंटमधून आपलं सध्याचं सामाजिक आरोग्य कसं आहे याचा अंदाज घेता येईल.

तळटीप : कालपरवाच “आदित्य…गप्पा मारायला येतोस का ?” असे फोन काही ज्येष्ठ तरुणांकडून आले आहेत. दुसऱ्याच्या आईबापाला आपण हवेहवेसे वाटणं ही तशी सुखकारकच गोष्ट. भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्षात या सोलापूरातल्या आपल्या सिनियर सिटिझन मित्रमैत्रिणींशी गप्पा मारुया का ? शहरातले ठिकठिकाणचे थकलेले आईबाबा आपली वाट पाहताहेत. सोलापूरातला विचारी संवेदनशील तरुण या नात्याने आपल्या सवडीनुसार जबाबदारी पार पाडूया का ? माझ्यासोबत कोण कोण येणार ?

आदित्य गाडगीळ